मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची दिवाळी नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावातील रामभाऊ बालपांडे या शेतकरी कुटुंबासोबत साजरी केली. मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्याच्या घरी रात्री मुक्काम केला. सकाळी निरोप देताना अरुणा बालपांडे यांचे डोळे पाणावले. घरी परत जाताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिवाळीचा फराळ, लाडू, चिवडा आणि शेतातील मोसंबी सोबत दिली.
ही दिवाळी अविस्मरणीय असल्याचे अरुणा बालपांडे यांनी सांगितले. मुख्यमंत्री साधेपणाने राहिले, नातीशी खेळले आणि दिवाळी साजरी केली, असे त्यांनी म्हटले. आपल्याकडे ते रात्री थांबले होते आणि विठ्ठलाच्या कृपेने त्यांचे पाय आपल्या घराला लागले, अशा भावना अरुणा बालपांडे यांनी व्यक्त केल्या.
मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाचे आभार मानले
मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या कुटुंबाबद्दल भरभरून बोलले. रामभाऊ बालपांडे कुटुंबाने खूप चांगले आगत-स्वागत केले, उत्तम जेवण आणि सकाळची न्याहारी दिली, असे त्यांनी सांगितले. संपूर्ण कुटुंबाशी जवळीक निर्माण झाली असून त्यांची नात नारायणी खूप गोड आहे आणि तिच्यासोबतही मैत्री झाली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हे शेतकरी कुटुंब असून त्यांच्याकडेही दुष्काळाचा परिणाम झाला आहे. संत्री, कापूस आणि सोयाबीन या पिकांवर परिणाम झाला आहे. मात्र एक समाधानाची बाब म्हणजे कुटुंबातील तीनही खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यांच्यामध्ये लढण्याची जिद्द दिसून आली, असे मुख्यमंत्री म्हणाले. हा संपूर्ण परिवार वारीला जाणारा असून विठ्ठल भक्त कुटुंब आहे. त्यांच्याकडून उभारी आणि आत्मविश्वास मिळाला, तसेच खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या घरी खूप छान झोप लागली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शेतातील बोअरवरील बंदी उठवणार
सकाळी मुख्यमंत्र्यांनी लोहारी सावंगा गावातील शेतकऱ्यांशी आणि सरपंचांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली. पंधरा डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकरी कुटुंबासोबत साजरी केलेली ही दिवाळी आणि त्यानिमित्ताने झालेली ही घोषणा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply