सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील अनागोंदी कारभारावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोलापूर-सांगली आरोग्य जनसंवाद यात्रेच्या आढावा बैठकीत त्यांनी आरोग्य प्रशासनाची कानउघडणी केली. शासकीय सेवेत असताना खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या कामचुकार डॉक्टरांना थेट घरी बसवण्याचा इशारा त्यांनी दिला. अशा डॉक्टरांच्या जागी नवीन तरुणांना संधी दिली जाईल, असेही ते म्हणाले.
रुग्णांची परवड आणि डॉक्टरांची गैरहजेरी
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची गैरहजेरी, प्रसुती टाळून रुग्णांची होणारी परवड आणि अत्यावश्यक औषधांचा तुटवडा अशा अनेक कारणांमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. वडाळा ग्रामीण रुग्णालयात दररोज सुमारे १०० रुग्णांची बाह्यरुग्ण तपासणी असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांची गैरहजेरी दिसून येते. ही तक्रार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी बैठकीत मांडली. पिंपळनेरमधील आरोग्य केंद्रातही संबंधित डॉक्टरांचे वर्तन असेच असल्याचे अण्णा ढोणे यांनी लक्ष वेधले. तुम्ही डॉक्टर म्हणून काम करताय की फक्त गणवेश घालून बसला आहात, असा सवालही बैठकीत विचारण्यात आला.
कामचुकार डॉक्टरांवर थेट कारवाई
गैरहजर डॉक्टरांची तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश आबिटकर यांनी दिले. रुग्णसेवेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. बोगस डॉक्टरांवर आठ दिवसांत धडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या बैठकीला खासदार ज्योती वाघमारे, उत्तमरव जानकर आणि आमदार अभिजीत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
याआधीची कारवाई काय होती?
प्रणिती शिंदे यांनी केलेल्या आरोपावर आबिटकर यांनी सांगितले की, याआधीही राज्यात ७१० गैरहजर डॉक्टरांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी ४४२ जणांवर कारवाई करण्यात आली आणि ५८ डॉक्टरांची सेवा समाप्त करण्यात आली. ही माहिती आबिटकर यांनी विधानपरिषदेत दिली होती. डायलेसीस सेंटरबाबत त्या कंपनीचे केंद्रातील दायित्व वाढले असून केंद्राकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी उपलब्ध झाला नसला तरी सेवा कुठेही बंद पडू नये, याबाबत कंपनीला सांगण्यात आले आहे. सगळीकडे सेवा सुरू आहे आणि महालॅबच्या बिलाबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply