ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा ५ नोव्हेंबर रोजी तिसरा दिवस आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोल नाका आणि साताऱ्यातील नागठाणे येथे हजारो शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडला आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला असून त्यामुळे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
४५०० रुपयांवरून आता ४२०० रुपयांची मागणी
सुरुवातीला उसाला प्रतिटन ४,५०० रुपये पहिली उचल मिळावी, अशी संघटनेची मागणी होती. मात्र, साखर कारखानदार ३,८०० रुपयांच्या पुढे जायला तयार नसल्याने चर्चेची गाडी पुढे सरकत नव्हती. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि चर्चेतून मार्ग निघावा, यासाठी राजू शेट्टी यांनी एक पाऊल मागे घेत ४,२०० रुपये पहिली उचल देण्याची नवी मागणी जाहीर केली आहे. आता कारखानदारांनीही अडेलतट्टू भूमिका सोडून शेतकऱ्यांना योग्य दर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. ४२०० रुपयांचा प्रस्ताव दिल्यानंतर कारखानदार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महामार्गावर वाहनांच्या रांगा; आंदोलकांची रात्र रस्त्यावर
आंदोलनामुळे किणी टोल नाका आणि नागठाणे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. साताऱ्यातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. अवजड वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी रात्र महामार्गावरच जागून काढली. गावोगावच्या महिलांनी पुढाकार घेत आंदोलकांसाठी भाकरी, भाजी आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. किणी टोल नाक्यावरील सभेत राजू शेट्टी यांनी कारखानदारांना थेट इशारा दिला. ऊस शेतकऱ्यांच्या दारात उभा आहे आणि दिवाळी तोंडावर आली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर साखर कारखान्यांच्या चेअरमन आणि संचालकांच्या घरासमोर शिमगा आंदोलन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. तोडगा निघणार की आंदोलन आणखी चिघळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply