लातूर जिल्ह्यात परवान्याशिवाय सावकारी करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. झडतीदरम्यान अवैध सावकारीशी संबंधित कागदपत्रे आढळल्यास संबंधित व्यक्तींवर लगेच गुन्हे नोंदवले जावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले आहेत. या कामात कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १४ प्रकरणांत झडतीची कार्यवाही झाली असून २ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध सावकारीबाबत आलेल्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा उपनिबंधक विष्णू पोतंगले यांच्यासह सर्व तालुक्यांचे सहायक निबंधक उपस्थित होते.
झडतीनंतर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
झडतीनंतर तथ्य आढळल्यास तातडीने गुन्हे दाखल करावेत, अन्यथा संबंधित सहायक निबंधकांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यापुढे झडतीच्या कारवाईचा आढावा तहसीलदारांनी घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी दिली. आतापर्यंत झालेल्या झडतींमध्ये तथ्य आढळलेल्या प्रकरणांत पुढील दोन दिवसांत गुन्हे दाखल करावेत, असेही त्यांनी सांगितले.
प्रलंबित तक्रारींवर तातडीने कार्यवाही
प्रलंबित तक्रारींवर तातडीने आणि गतीने कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास ठरावीक वेळेत पूर्ण करून पुढील कार्यवाही वेगाने करावी, असेही त्यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply