मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी परिस्थिती नव्हे, तर जिद्द महत्त्वाची असते, हे जगदीश कांबळे यांनी दाखवून दिले. सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर एका सामान्य डिलिव्हरी बॉयने आपल्या संघर्षाची आणि विखुरलेल्या कुटुंबाची कहाणी सांगत सर्वांची मने जिंकली. हा भाग केवळ एका स्पर्धकाचा राहिला नाही, तर तो एका लेकराने मंचावरून आपल्या आईला मारलेली आर्त हाक ठरला.
हॉट सीटचे स्वप्न आणि साधेपणा
‘कोण होणार करोडपती’मध्ये येण्याचे, माधुरी दीक्षित यांना भेटण्याचे आणि त्यांच्यासमोर हॉट सीटवर बसण्याचे जगदीश यांचे स्वप्न होते. या खास क्षणासाठी त्यांनी मित्राकडून अडीच हजार रुपये उधार घेतले. त्यातून चारशे रुपयांचा शर्ट, हजार रुपयांची पॅण्ट आणि हजार रुपयांचे बूट खरेदी केले. मात्र, या कपड्यांवर बूट जुळत नव्हते, म्हणून त्यांना रोजच्याच वापरातील सॅंडल घालून यावे लागले. ही सॅंडलही फाटकी असल्याचे त्यांनी प्रामाणिकपणे सांगितले. त्यांचा साधा भोळा स्वभाव आणि प्रामाणिक वक्तव्य ऐकून माधुरी दीक्षित यांच्यासह सगळ्यांचेच मन हेलावले.
आईच्या आठवणीने भावूक क्षण
जगदीश यांच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती. गप्पांच्या ओघात त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत भावूक आणि वेदनादायी पैलू समोर आला. वडिलांच्या त्रासामुळे जगदीश यांची आई त्यांना आणि कुटुंबाला सोडून निघून गेली होती. आईच्या जाण्याने त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी आणि तिची उणीव त्यांना प्रत्येक क्षणी जाणवत आहे.
हॉट सीटवर बसून आईची आठवण काढताना जगदीश अत्यंत भावूक झाले. डोळ्यात अश्रू आणून ते म्हणाले की, आज जर त्यांची आई सोबत असती, तर त्यांच्या छातीवर तीन स्टार असते. पुढे थेट कॅमेऱ्याकडे पाहत त्यांनी आपल्या आईला साद घातली की, ती कुठेही असली आणि हा कार्यक्रम पाहत असली, तर तिने परत यावे; ते तिला काही विचारणार नाहीत, काही बोलणार नाहीत. जगदीश यांच्या या आर्त हाकेने मंचावर एकच शांतता पसरली आणि उपस्थित प्रत्येकाचे मन हेलावले.
माधुरी दीक्षित यांनी जगदीश यांच्या साधेपणाचे, प्रामाणिकपणाचे आणि जिद्दीचे कौतुक केले. ‘कोण होणार करोडपती’ हा केवळ प्रश्नोत्तरांचा खेळ नसून सामान्यांच्या स्वप्नांना, त्यांच्या वेदनांना आणि भावनांना हक्काचे व्यासपीठ देणारा मंच आहे, हे या भागाने पुन्हा एकदा सिद्ध केले. हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर पाहता येतो.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply