ऊसाला पहिल्या उचलीसाठी ४२०० रुपये मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्रात रस्त्यावर उतरली आहे. संघटनेचे गेल्या ४५ तासांपासून पुणे-बंगळुरू महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू आहे. सरकारकडून तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू असतानाच, वेळीच तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
स्वाभिमानीने मुंबईचा दाणापाणी बंद करण्याचा इशारा बुधवारी दिला होता. भाजीपाला आणि दूध मुंबईत जाऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. शेतकऱ्यांची दिवाळी महामार्गावर साजरी होत असेल तर गप्प बसले जाणार नाही, असा खणखणीत इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प
पुणे-बंगळुरू महामार्ग गेल्या ४५ तासांपासून ठप्प आहे. या आंदोलनाचा मोठा फटका मालवाहतुकीवर बसला आहे. देशभरात जाणारा माल रस्त्यावरच अडवण्यात आल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. साताऱ्यापासून ते कागलच्या पुढे कर्नाटक हद्दीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या महामार्गावर ४ हजारांहून अधिक वाहने अडकून पडली आहेत.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग हा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या मालवाहतुकीतील प्रमुख मार्ग आहे. या महामार्गावरून रोज २५ हजारांहून अधिक मालवाहतूक वाहने धावतात. ऐन दिवाळीच्या तोंडावर अवजड वाहतूक ठप्प झाल्याने मालवाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तोडग्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply