आजच्या डिजिटल आणि हायब्रिड कामाच्या युगात दुबईने पुन्हा एकदा जगाला थक्क करणारा नवा उपक्रम राबवला आहे. चार भिंतींच्या बंदिस्त कार्यालयात किंवा कॅफेमधील गोंगाटात काम करून कंटाळलेल्या लोकांसाठी दुबई नगरपालिकेने वर्क फ्रॉम पार्क ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. अल बरशा पॉन्ड पार्क येथे दुबईच्या पहिल्या अधिकृत वर्क फ्रॉम पार्क केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. आता नोकरदार, फ्रीलान्सर्स आणि स्टार्टअप उद्योजक थेट हिरव्यागार झाडांच्या सावलीत, तलावाच्या सुंदर पार्श्वभूमीवर बसून कार्यालयीन काम करू शकणार आहेत.
हा प्रकल्प दुबई नगरपालिकेने लेट्सवर्क या फ्लेक्सिबल वर्कस्पेस प्लॅटफॉर्म आणि ग्रुप अमाना या शाश्वत बांधकाम कंपनीसोबतच्या भागीदारीतून उभारला आहे. येथे केवळ बसण्यासाठी बाक नसून कामासाठी आधुनिक आणि आरामदायक वातावरण तयार करण्यात आले आहे.
मोफत आऊटडोअर डेस्क आणि रूफटॉप सिटिंग
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उद्यानातील मोकळ्या हवेत, झाडांच्या सावलीत आणि इमारतीच्या छतावर बसून काम करण्यासाठी बनवलेले आऊटडोअर डेस्क पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. येथे येणाऱ्या कोणत्याही नागरिकाला किंवा पर्यटकाला पूर्व-बुकिंगशिवाय या मोकळ्या जागेचा आणि हाय-स्पीड इंटरनेटचा वापर करता येतो.
हाय-टेक इंडोर को-वर्किंग झोन आणि मीटिंग रूम्स
उन्हाचा त्रास टाळण्यासाठी किंवा शांततेत काम करण्यासाठी येथे वातानुकूलित इंडोर वर्कस्पेस तयार करण्यात आली आहे. यामध्ये तीन मुख्य विभाग आहेत. को-वर्किंग झोनमध्ये एकाच वेळी ३० लोक काम करू शकतात. ५० दिरहॅम म्हणजे सुमारे १,१५० रुपयांच्या दैनंदिन पासमध्ये दिवसभर काम करण्याची सोय आणि एक मोफत कॉफी किंवा चहा मिळतो. नऊ लोकांच्या क्षमतेच्या दोन अत्याधुनिक मीटिंग रूम्स उपलब्ध आहेत, ज्यात सादरीकरणासाठी ऑडिओ-व्हिज्युअल स्क्रीन आणि व्हाईटबोर्डची सोय आहे. फ्रीलान्सर्स, स्टार्टअप्स आणि कंपन्यांसाठी एक महिन्यापासून ते एक वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी फिक्स डेस्क आणि प्रायव्हेट ऑफिस भाड्याने घेण्याची सोयही आहे.
या वर्कस्पेसचे बुकिंग लेट्सवर्क अॅप, अधिकृत संकेतस्थळ किंवा थेट व्हॉट्सअॅपवरून काही मिनिटांत करता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बांधकामासाठी उद्यानातील झाडांना किंवा नैसर्गिक सौंदर्याला कोणतीही हानी पोहोचवण्यात आलेली नाही. डूबॉक्स या ऑफ-साइट मॉड्यूलर बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करून हे स्ट्रक्चर बाहेर तयार करून पार्कमध्ये असेंबल करण्यात आले आहे. पालकांना उद्यानात मुले खेळत असताना शेजारीच बसून लॅपटॉपवर काम करता येणार आहे. उद्यानातील धावण्याचे ट्रॅक, सायकल ट्रॅक, खेळाची मैदाने आणि रेस्टॉरंट्स पूर्ववत सुरू राहतील. हा उपक्रम दुबई २०४० अर्बन मास्टर प्लॅन आणि दुबई इकॉनॉमिक अजेंडा डी३३ या दूरदृष्टीचा भाग आहे. या पहिल्या प्रयोगाच्या यशानंतर दुबईतील इतर प्रमुख सार्वजनिक उद्यानांमध्येही अशी केंद्रे उभारली जाणार आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply