दिवाळीच्या दिवसांत घराघरांत आनंदाचे वातावरण असते. फराळ, पाहुणे आणि सणाची लगबग यामध्ये आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. मात्र सणाच्या काळात आहाराबरोबरच आपली दिनचर्याही तितकीच महत्त्वाची असते, असे आयुर्वेद तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भुसावळ येथे एका व्याख्यानमालेत डॉ. पूर्वा ठाकूर यांनी या विषयावर मार्गदर्शन केले.
ऋतुसंधीच्या काळात काळजी आवश्यक
आयुर्वेदानुसार शरद ऋतू आणि हेमंत ऋतू यांच्यामधील काळ हा ऋतुसंधीचा असतो. या काळात वातावरणात होणाऱ्या बदलांचा शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे आहार, विहार आणि दिनचर्येत योग्य बदल करणे आवश्यक असते. हेमंत ऋतूत पचनशक्ती तुलनेने चांगली असते. त्यामुळे प्रकृतीनुसार पौष्टिक आणि स्निग्ध पदार्थांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करावा, असा सल्ला डॉ. ठाकूर यांनी दिला.
अभ्यंगस्नानामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते, शरीरातील वातदोषाचे संतुलन राखले जाते आणि स्नायूंना आराम मिळतो. कोमट तेलाने डोके आणि शरीराची योग्य पद्धतीने मालिश करावी. विशेषतः पायांना तेल लावून मालिश केल्यास शांत झोप लागण्यास मदत होते. मात्र अजीर्ण, ताप किंवा काही विशिष्ट शारीरिक त्रास असलेल्या व्यक्तींनी अभ्यंग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
आहार आणि व्यायामाच्या साध्या सवयी
कोमट पाणी प्यावे, रसापेक्षा शक्यतो ताजी फळे खावीत, असा सल्ला देण्यात आला. दूध पचण्यास जड वाटत असल्यास ते मर्यादित प्रमाणात घ्यावे. त्यात हळद, सुंठ किंवा ज्येष्ठमध घालण्याचे फायदेही सांगण्यात आले.
वृद्धावस्थेत शरीराची क्षमता लक्षात घेऊन व्यायाम करावा. कोवळ्या उन्हात काही वेळ बसणे, रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करणे, पुरेशी झोप घेणे आणि तहानेनुसार पाणी पिणे या साध्या पण महत्त्वपूर्ण सवयी आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. योगासने, प्राणायाम, वाचन आणि ध्यानधारणा यांमुळे शरीरासोबत मनालाही शांतता आणि प्रसन्नता मिळते. केवळ बाह्य आरोग्य नव्हे, तर अंतर्मनाचे आरोग्य जपणेही तितकेच आवश्यक असल्याचे डॉ. ठाकूर यांनी नमूद केले.
हे मार्गदर्शन अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित साप्ताहिक व्याख्यानमालेत करण्यात आले. संघाच्या अध्यक्षा अलका ढाके या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. सचिव गजानन सेवलकर यांनी सूत्रसंचालन केले, तर अशोक निकम यांनी आभार मानले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply