धुळे शहरात एकाच दिवशी घडलेल्या दोन दुर्दैवी घटनांनी दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तापी नदीत उडी घेतलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याची वार्ता ऐकून धुळ्याकडे निघालेल्या मेव्हण्याचाही वाटेत अपघातात अंत झाला.
तापी नदीवरील पुलावरून उडी
धुळे शहरातील धनगरवाडा परिसरातील सौरभ एकनाथ वाघमोडे (वय २३) याने मित्रांसमोरच तापी नदीत उडी घेतली. सौरभ हा धुळे पोलिस दलातील एकनाथ माणिक वाघमोडे यांचा लहान मुलगा होता. तो सोमवारी (ता. ४) रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास दुचाकीने तापी नदीवरील दभाषी पुलावर गेला होता. तेथून त्याने काही मित्रांना फोन करून पुलावर वाद झाल्याचे सांगितले. मित्र तत्काळ घटनास्थळी पोहोचले असता सौरभ पुलावरून काही अंतरावर उभा होता. त्यांनी त्याला टोकाचे पाऊल उचलू नको, अशी विनंती केली. मात्र मित्र त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्याने नदीत उडी घेतली. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. त्याच्या मागे आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.
मेव्हण्याचाही वाटेत अपघाती मृत्यू
दरम्यान, सौरभच्या मृत्यूची वार्ता समजल्यानंतर त्याचा मेव्हणा विशाल गोरख सरक (वय २७, रा. महिर, ता. साक्री) साक्रीहून धुळ्याकडे येत होता. भदाणे गावाजवळ राम हॉटेल व आश्रमशाळेसमोरील परिसरात त्याच्या वाहनाला अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. विशाल एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होता.
२०२० मध्ये सुरत-नागपूर महामार्गावरील कोंडाईबारी घाटात झालेल्या अपघातात विशालचे वडील, बहीण आणि मेव्हणे अशा तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वडिलांच्या जागेवर त्याला एसटी महामंडळात नोकरी मिळाली होती. दीड वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्याच्या मागे आई आणि बहीण असा परिवार आहे. दिवाळीच्या काळात शालक आणि मेव्हण्याचा अशा प्रकारे अंत झाल्याने धुळे व महिर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply