सकाळच्या नाश्त्याला रोज पोहे, उपमा किंवा बेसनाचा पराठा खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काहीतरी नवीन आणि चटपटीत करून पाहायला हवे. रवा आणि बटाटा वापरून घरच्या घरी झटपट कुरकुरीत पराठा किंवा चिला तयार करता येतो. हा चिला बाहेरून हलका कुरकुरीत, तर आतून मऊ लागतो आणि चवीला एकदम चटपटीत असतो. विशेष म्हणजे यासाठी लागणारे सगळे साहित्य सहज घरात उपलब्ध असते.
लागणारे साहित्य
१ कप रवा, अर्धा कप दही, २ मध्यम आकाराचे बटाटे, १ बारीक चिरलेला कांदा, १ चमचा किसलेले आले, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणेपूड, चवीनुसार मीठ, तसेच पाणी आणि तेल.
बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्यावेत आणि किसून एका मोठ्या भांड्यात घ्यावेत. त्यामध्ये रवा आणि दही घालून व्यवस्थित एकत्र करावे. आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून मिश्रण तयार करावे आणि हे मिश्रण १५ मिनिटे झाकून ठेवावे. त्यानंतर या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, किसलेले आले आणि कोथिंबीर घालावी. हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड आणि मीठ घालून सगळे साहित्य व्यवस्थित एकत्र करावे. मिश्रण जास्त घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालावे. गॅसवर तवा गरम करून त्यावर थोडे तेल सोडावे. तयार मिश्रण मोठ्या चमच्याने तव्यावर टाकून गोलाकार पसरवावे. चिल्याच्या कडांना थोडे तेल सोडून मंद ते मध्यम आचेवर भाजावे. खालची बाजू सोनेरी झाल्यानंतर चिला अलगद पलटवावा आणि दुसरी बाजूही छान सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावा. अशाच प्रकारे उर्वरित मिश्रणाचे चिले तयार करावेत. तयार झालेला रवा-बटाटा चिला गरमागरम सर्व्ह करावा. त्यासोबत हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा दही दिल्यास त्याची चव आणखी वाढते. सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच संध्याकाळच्या भुकेसाठीही हा एक चविष्ट पर्याय ठरू शकतो.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply