बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जिल्ह्यातील गावागावांत चित्ररथातून होणार जागर

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जिल्ह्यातील गावागावांत चित्ररथातून होणार जागर

सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आता चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावागावांत पोहोचणार आहे. जिल्हा वार्षिक योजना (विशेष घटक योजना) अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्यावतीने हा जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्या योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा यामागील उद्देश आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी आज सकाळी चित्ररथाला हिरवा झेंडा दाखविला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम झाला. यावेळी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी अभिजित नाईक, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त देवीदास नांदगावकर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी दत्ता आव्हाड, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, माहिती अधिकारी गोपाल साळुंखे उपस्थित होते.

चित्ररथ जिल्ह्यातील विविध गावांना भेट देऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती नागरिकांना देणार आहे. योजनांचे स्वरूप, लाभ मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधांची माहिती सोप्या व प्रभावी पद्धतीने चित्ररथात मांडण्यात आली आहे. चित्ररथाच्या माध्यमातून थेट गावपातळीवर जनजागृती करण्यात येणार आहे. योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, सामाजिक न्यायाच्या माध्यमातून समताधिष्ठित समाजनिर्मितीला बळ देणे, वंचित व दुर्बल घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि शासनाच्या योजनांचा लाभ पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचविणे या व्यापक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. योजनांची माहिती प्रत्येक गावात, विकासाची संधी प्रत्येक पात्र लाभार्थ्याला, या संकल्पनेतून चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रभावी जनजागृती होणार आहे.

अपर जिल्हाधिकारी श्रीमती पाटील, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. नांदगावकर यांनी चित्ररथाच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी चित्ररथ आणि प्रसिद्धीचे नियोजन याविषयीची माहिती प्रास्ताविकात दिली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

फोटो गॅलरी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance