मुंबई महापालिकेने अभिनेत्री दिया मिर्झाचा व्हिडिओ हटवल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर भाजप आमदार अमित साटम यांनी आपली भूमिका मांडली आहे. देशात अराजकता पसरवणाऱ्यांबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या लोकांबाबत आपला आक्षेप होता आणि राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र जाती, धर्म आणि भाषेच्या आधारावर कोणताही आक्षेप नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
महापालिकेला वाटले म्हणून व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आणि त्यांनाच वाटले म्हणून तो हटवला, असे साटम म्हणाले. याचे स्पष्टीकरण प्रशासनच देऊ शकेल. जे हँडल चालवतात तेच पोस्ट टाकू शकतात आणि हटवूही शकतात; हा त्यांचाच अधिकार असतो, अशी त्यांची प्रतिक्रिया आहे.
पुढील काळात संस्थांनी गृहपाठ करून निर्णय घ्यावेत
येणाऱ्या काळात महापालिका असो किंवा कोणतीही संस्था असो, त्यांनी कोणत्या लोकांसोबत जोडले जात आहोत, कोणत्या लोकांची मदत घेतो किंवा कोणत्या लोकांना मदत करतो, याचा गृहपाठ करून विचारपूर्वक निर्णय घेतले, तर अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, असे मत साटम यांनी व्यक्त केले.
न्यायालयाने कोणत्या संदर्भाने ही टिप्पणी केली, त्याचा आपण नक्कीच अभ्यास करू, असेही साटम म्हणाले. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, कोणत्याही व्यक्तीवर घेतलेला आक्षेप हा त्याच्या धर्म, जात किंवा प्रांतावर आधारित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी आणि यानंतरही देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांचा विरोध आपण करणार असून त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यापूर्वी विचार करावा, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
न्यायालयाने काय म्हटले होते?
दरम्यान, या व्हिडिओप्रकरणी उच्च न्यायालयाने भाजप नेत्यांना फटकारले आहे. दिया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. त्याचवेळी काही राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांमुळे आपण अस्वस्थ आहोत, असे निरीक्षण न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने नोंदवले आहे. दिवाळीत सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडू नयेत, या न्यायालयाच्या निर्देशांबाबत जागृती मोहिमेचा भाग म्हणून मुंबई महापालिकेच्या विनंतीवरून मिर्झा यांनी हा व्हिडिओ बनवला होता. मात्र त्यानंतर साटम यांनी या व्हिडिओवर आक्षेप घेत, दिवाळी कशी साजरी करावी याबद्दल मिर्झा यांनी धडे देण्याची गरज नाही, असे म्हटले होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply