धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांना सूक्ष्म वित्तसंस्थांच्या अधिकाऱ्यांकडून कर्जवसुली आणि व्याजाच्या नावाखाली त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर इशारा दिला आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दिवाळी शिधा वाटप कार्यक्रमात इशारा
मदतीचे तोरण, हेच शिवसेनेचे धोरण या उपक्रमांतर्गत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना दिवाळी शिधा वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून सांजा परिसरातील एका मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते दिवाळी शिधा किटचे वाटप करण्यात आले.
दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याचे सांगत सरनाईक म्हणाले की, केवळ आर्थिक मदतच नव्हे तर शेतकऱ्यांना मानसिक आधार देणेही गरजेचे आहे. आजची मदत ही केवळ सुरुवात असून, संपूर्ण संकट काळात शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या दारात जाऊन विचारपूस करेल आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.
सामुदायिक विवाह सोहळ्याची घोषणा
दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबातील आनंदाचे क्षण हिरावले जाऊ नयेत, असे सरनाईक म्हणाले. घरातील मुला-मुलींच्या लग्नाची चिंता शेतकऱ्यांनी करू नये. पालकमंत्री म्हणून या जबाबदारीत आपण कुठेही कमी पडणार नाही, असे सांगत त्यांनी शिवसेनेच्या वतीने लवकरच सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा केली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply