रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात शास्त्री नदी परिसर आणि आसपासच्या गावांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. रेन ट्री फाउंडेशन आणि सम्यू इकोलॉजिकल फाउंडेशन यांच्या पुढाकाराने हे काम सुरू झाले असून, पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या कनकाडी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला आहे. पर्यावरण आणि हवामान बदल यासंदर्भातील विविध विषयांवर सर्वेक्षण करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत गावात वर्षातील तिन्ही ऋतूंमध्ये होणाऱ्या पर्यावरणीय बदलांची माहिती गोळा केली जात आहे. कनकाडी येथे दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी गावात फिरून पावसाळ्यानंतरच्या हंगामातील पाहणी व सर्वेक्षण केले. ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा झाली. यामध्ये गावात आढळणारे दुर्मिळ पक्षी, जंगली प्राणी तसेच दरवर्षी लागणाऱ्या वणव्यांची संभाव्य कारणे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यावर सखोल चर्चा झाली.
कचरा व्यवस्थापन आणि ग्रामसेवकांची मते
घरोघरी तयार होणारा ओला व सुका कचरा, त्याचे संकलन आणि विल्हेवाट याविषयीही ग्रामस्थांकडून माहिती घेण्यात आली. ग्रामसेवक वैभव शिंदे यांची मुलाखत घेऊन विविध विषयांवर त्यांची मते जाणून घेण्यात आली.
या वेळी ग्रामस्थांनी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमोर विविध समस्या मांडल्या. लक्ष्मीकांत गाताडे यांनी गावात लागणाऱ्या वणव्यांचा प्रश्न अत्यंत बिकट असल्याचे सांगितले. माजी ग्रामपंचायत सदस्या रेवती पंडित यांनी गावातील दुर्मिळ पक्षी व प्राण्यांच्या संवर्धनाची तातडीची गरज असल्याचे स्पष्ट केले. ग्रामस्थ अनिल जाधव यांनी स्थानिक खडी क्रशरमुळे होणारे प्रदूषण गंभीर बनत असून त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना केली.
नैसर्गिक पाणवठ्यांचे जतन करण्याची मागणी
कनकाडी गावातील नैसर्गिक पाणवठ्यांचे जतन करणे आवश्यक असून, ऐतिहासिक पांडवकालीन टाक्यांची स्वच्छता व संवर्धन करण्याची मागणी अमित पंडित यांनी केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या पाणवठ्यातील पाण्याचा उपयोग ग्रामस्थांना दैनंदिन वापरासाठी होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
या दौऱ्यात रेन ट्री फाउंडेशनचे किशोर रक्षे, श्रुतिका चव्हाण, रामचंद्र बोदले आणि सम्यू इकोलॉजिकल फाउंडेशनचे डी. पी. श्रीवास्तव, अमेय पारकर, कुमार पाटील, तन्मय चेंबूरकर व नितीश बोदरे उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply