राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचा कारभार सर्वांना सोबत घेऊन आणि सर्वानुमते चालला पाहिजे, तसेच ज्येष्ठ नेत्यांचा अनुभव आणि सल्ला विचारात घेतला पाहिजे, अशी भूमिका वरिष्ठ नेत्यांनी मांडली. या बैठकीला पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित होते.
पदनिवडीत वरिष्ठांना डावलल्याची तक्रार
पक्षातील महत्त्वाच्या पदांवरील निवड प्रक्रियेत ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली. मुंबई अध्यक्ष, राष्ट्रीय मुख्य प्रवक्ता, युवती अध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय युवक प्रदेशाध्यक्ष या पदांच्या निवडीदरम्यान पार्थ पवार यांनी वरिष्ठ नेत्यांना डावलल्याची नाराजी व्यक्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे सांगण्यात येते.
समन्वयाचे आश्वासन; उद्या आमदारांची बैठक
पार्थ पवार आणि जय पवार यांनी ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यापुढे सर्व ज्येष्ठ नेत्यांशी समन्वय साधून आणि त्यांना विश्वासात घेऊन काम केले जाईल, असे आश्वासन दोघांनी दिल्याची माहिती आहे. याआधी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली होती. त्या भेटीत पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे विलीनीकरण नको आणि राज्याचे अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहावे, अशी भूमिकाही वरिष्ठ नेत्यांनी मांडल्याचे बैठकीत सांगण्यात आले. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी पक्षातील सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील देवगिरी निवासस्थानी संध्याकाळी सात वाजता ही बैठक होणार असून तब्बल चार महिन्यांनंतर आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक परिस्थितीवर चर्चा होणार असून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या दौऱ्यांबाबतही आमदारांना माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply