अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाकडून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तब्बल १,४०० घरे उभारली जाणार आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून अंबरनाथ आणि कल्याण परिसरात ही घरे उभारली जात असून, ९५० घरांचे प्रत्यक्ष काम सुरू आहे, तर उर्वरित ४५० घरे वेगवेगळ्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील तीन वर्षांत या सर्व घरांचे काम पूर्ण केले जाणार आहे.
चार ठिकाणी घरांची कामे आणि नियोजन
अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांकडून प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांना पसंती दिली जात आहे. त्याची दखल घेत कोकण मंडळाकडून अंबरनाथ नजीक कोचकुंटवली येथे ६०० घरांचे काम सुरू केले आहे. शिवगंगा नगर येथे ३५० घरांचे नियोजन असून, त्याच्या आराखड्याला मंजुरीची प्रतीक्षा सुरू आहे. मोरीवली येथे १०२ घरे उभारली जाणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. कल्याण नजीक घोटेघर येथे ३४८ घरांचे काम सुरू आहे. त्यामुळे अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना सहजपणे घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत.
३२० चौरस फूट घरे, किंमत २० ते २२ लाख
म्हाडाकडून या योजनेंतर्गत उभारली जाणारी सर्व घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत. ३२० चौरस फूट चटई क्षेत्रफळ असलेल्या या घरांची किंमत २० ते २२ लाख रुपयांच्या घरात असणार आहे. ही घरे तीन वर्षांत उभारून पूर्ण केली जाणार आहेत. त्यानंतर लॉटरीच्या माध्यमातून त्यांची विक्री केली जाणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply