कऱ्हाड येथील सरस्वती विद्यामंदिरात विद्यार्थ्यांसाठी बालबाजार आयोजित करण्यात आला. केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून त्याला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, उद्योजकतेला आणि व्यवहारकौशल्याला वाव देणाऱ्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
खाद्यपदार्थ आणि हस्तकलेचे स्टॉल
बालबाजारात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे आणि आकर्षक वस्तूंचे स्टॉल उभारले होते. उकडीचे मोदक, ढोकळा, आप्पे, इडली, भेळ, सुरळीची वडी, मठ्ठा, ताक आणि घरगुती डोनेट्स अशा रुचकर पदार्थांनी खमंग वातावरण निर्माण झाले होते. पदार्थांची चव, वैविध्य आणि आकर्षक मांडणी यामुळे खवय्यांनी चांगली पसंती दिली. यासोबतच विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, आकाशकंदील आणि सजावटीचे साहित्यही मांडले होते.
प्रत्यक्ष व्यवहारातून व्यवहारज्ञान
या बालबाजाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष खरेदी-विक्रीचे व्यवहार केले. वस्तूंची किंमत ठरवणे, पैशांची देवाणघेवाण, ग्राहकांशी संवाद साधणे, वस्तूंची गुणवत्ता पारखणे आणि नफा-तोट्याचे प्राथमिक गणित समजून घेणे, अशा अनेक गोष्टींचा त्यांना अनुभव मिळाला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सी. ए. गोडबोले, विश्वस्त स्वाती भागवत, गीतांजली तासे, माधुरी साने आणि राजेश काळे उपस्थित होते. बालबाजारात खरेदीसाठी पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आयोजनासाठी मुख्याध्यापिका रूपाली तोडकर, वर्गशिक्षिका नीलिमा पाटील आणि नामदेव जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply