धुळे शहरातील श्रीजी इंग्लिश मीडियम स्कूल आणि हंसराज ओंकारमल शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घासकडबी शैक्षणिक संस्थेच्या स्व. प्रतिभा देशपांडे विज्ञान संग्रहालयास नुकतीच भेट दिली. विज्ञानाच्या संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगांतून समजावून घेण्यासाठी हे संग्रहालय सुरू करण्यात आले आहे.
२० वर्षांपासून विज्ञान-गणित क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम
प्रा. वसंत यशवंत घासकडबी आणि मंदाकिनी वसंत घासकडबी शैक्षणिक संस्था धुळे शहरात विज्ञान व गणित क्षेत्रात गेल्या २० वर्षांपासून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या माध्यमातून धुळ्यातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीपर्यंत जात आहेत. सध्या हे संग्रहालय घासकडबी संस्था आणि कुमारनगर वेल्फेअर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने स्वामी टेऊराम हायस्कूल येथे सुरू आहे. हे संग्रहालय सर्वांसाठी खुले असून त्याच्या माध्यमातून विज्ञानाच्या संकल्पना समजण्यास मदत होते.
९० विद्यार्थ्यांची भेट; लाभ घेण्याचे आवाहन
श्रीजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता सहावी व सातवीच्या ४५ विद्यार्थ्यांनी नुकतीच भेट दिली आणि विज्ञानाचे प्रयोगही करून पाहिले. तसेच हंसराज ओंकारमल अग्रवाल शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी ४५ विद्यार्थी आणि शिक्षकांनीही भेट दिली व विज्ञानाच्या संकल्पना समजावून घेतल्या. विज्ञान संग्रहालयाचा लाभ मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना करून द्यावा, तसेच धुळेकर नागरिकांनीही याचा लाभ घ्यावा, असे आवाहन घासकडबी संस्थेचे सचिव डॉ. एन. एम. जोशी आणि कुमारनगर वेल्फेअर संस्थेचे सचिव डॉ. विलास रेलन यांनी केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply