इंग्रजी ही केवळ संवाद साधण्याची एक भाषा असली, तरी भारतात मात्र तिला अनेकदा प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. मोठमोठ्या हॉटेलांपासून ते नामांकित कंपन्या आणि सरकारी कार्यालयांपर्यंत अनेक ठिकाणी इंग्रजी बोलणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण असल्यासारखे मानले जाते. एखादी व्यक्ती अस्खलित इंग्रजी बोलताना दिसली की तिच्याकडे कौतुकाने पाहिले जाते. मात्र, दुसरीकडे ज्यांना इंग्रजी व्यवस्थित बोलता येत नाही किंवा समजत नाही, अशा व्यक्तींना अनेकदा कमी लेखले जाते. त्यांच्या भाषेवरून किंवा बोलण्याच्या पद्धतीवरून त्यांची पात्रता ठरवण्याचा प्रयत्न केला जातो.
ताज हॉटेलमधील संतापजनक प्रकार
असाच एक संतापजनक प्रकार देशातील नामांकित ताज हॉटेलमध्ये घडला आहे. आग्रा येथील ताज हॉटेलमध्ये एका श्रीमंत पाहुण्याने इंग्रजी भाषेवरून झालेल्या वादातून वेटरला थोबाडीत मारल्याची घटना समोर आली आहे. पाहुण्याने आपल्या पैशाचा आणि इंग्रजीचा माज दाखवत कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचे सांगितले जात आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याला अशा प्रकारे मारहाण करणे हे पूर्णपणे चुकीचे असून, या घटनेमुळे भाषेच्या नावाखाली होणाऱ्या भेदभावावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
व्यवस्थापनाने घेतले कठोर पाऊल
या घटनेनंतर हॉटेल व्यवस्थापनाने मात्र ठाम भूमिका घेतली आहे. संबंधित पाहुण्याचा पैशांचा माज उतरवत व्यवस्थापनाने त्याच्यावर आजीवन बंदी घातली आहे. म्हणजेच, तो पाहुणा यापुढे त्या हॉटेलमध्ये येऊ शकणार नाही. व्यवस्थापनाच्या या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत होत आहे. कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचे रक्षण करणे हे कोणत्याही आस्थापनाचे कर्तव्य असून, पैसा किंवा भाषा यांच्या जोरावर कोणालाही कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करण्याचा अधिकार नाही, हा संदेश या कारवाईतून मिळाला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply