गोल्फ हा अत्यंत महागडा खेळ मानला जातो. या खेळासाठी लागणारी साधनसामग्री इतर खेळांपेक्षा वेगळी आणि खर्चिक असते. मात्र या खेळातील सुप्त प्रतिभा शहरातच नव्हे, तर गावे आणि वाडी-वस्त्यांवरही असू शकते. त्यामुळेच वंचित आणि गरजू घटकांतील होतकरू खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये देशातील पहिल्या विशेष निवासी गोल्फ प्रशिक्षण अकादमीची स्थापना केली जात आहे.
एमजीएम आणि द गोल्फ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही अकादमी उभारली जात आहे. एमजीएम गोल्फ क्लबचे संस्थापक संचालक रणजित कक्कड यांच्या मते, या उपक्रमामुळे छत्रपती संभाजीनगर शहर देशाच्या गोल्फ नकाशावर अधिक ठळकपणे उदयास येईल. कक्कड मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील असून त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट फ्रान्सिस स्कूलमध्ये झाले आहे. त्यांनी लंडन साउथ बँक युनिव्हर्सिटीमधून एमबीए आणि एमजीएम विद्यापीठातून मॅनेजमेंट सायन्समध्ये पीएचडी केली आहे, तसेच हार्वर्ड विद्यापीठाशी संबंधित शिक्षणही घेतले आहे.
आंतरराष्ट्रीय सुविधा आणि मोफत प्रशिक्षण
जागतिक स्तरावर किंवा अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स गोल्फ असोसिएशनसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये चमक दाखवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार केलेल्या ग्रीन सुविधांची अत्यंत गरज असते. हीच गरज ओळखून एमजीएमच्या भागीदारीतून छत्रपती संभाजीनगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. खेळाडूंना केवळ मुख्य खेळातच नव्हे, तर खेळाशी संबंधित इतर क्षेत्रांतही रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, म्हणजेच आठ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांतील मुलांना गोल्फचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. काही महिन्यांपूर्वी राबवण्यात आलेल्या नॅशनल टॅलेंट हंटमधून निवडलेल्या पंधरा ते वीस विद्यार्थ्यांना सध्या उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जात असून, त्यातील काही खेळाडूंना दिल्ली येथेही विशेष प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे.
२६ वर्षांत १२६ खेळाडूंना दत्तक
द गोल्फ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा अर्जुन पुरस्कार विजेते अमित लुथरा यांच्या मते, देशातील कानाकोपऱ्यात आणि ग्रामीण भागात दडलेल्या क्रीडा गुणवत्तेला शोधून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवण्याचा ध्यास फाउंडेशन आणि इंडियन गोल्फ प्रीमियर लीग यांनी घेतला आहे. मागील २६ वर्षांपासून सुरू असलेल्या या मोहिमेतून आजवर ग्रामीण भागातील तब्बल १२६ गरजू आणि गुणवंत खेळाडूंना दत्तक घेऊन त्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण व पाठबळ देण्यात आले आहे.
पुढे फाउंडेशनने आपल्या कार्याचा विस्तार करत देशातील ज्या ग्रामीण व दुर्गम भागात अजूनही गोल्फ या खेळाचे नावही पोचलेले नाही, अशा भागात प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांमध्ये या खेळाविषयी आवड निर्माण करण्याचे ठरवले आहे. विद्यार्थ्यांना केवळ खेळाची माहिती न देता त्यांना या खेळात तज्ज्ञ बनवण्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाईल. या शोधमोहिमेतूनच भारताला गोल्फ क्षेत्रातील खरा हिरा मिळेल, असा विश्वास लुथरा यांनी व्यक्त केला आहे.
हा खेळ फारसा पदकविजेता नसल्याचे कारण सांगून शासन या खेळाकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही, अशी खंतही व्यक्त करण्यात आली. मात्र खेळाडू जोपर्यंत या खेळात प्रवेश करणार नाहीत आणि त्यांना सुविधा मिळणार नाहीत, तोपर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदकांची अपेक्षा कशी करणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यामुळे शासन आणि उद्योगांनीही या खेळाला पाठबळ देणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत मांडण्यात आले.
गोल्फमुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक फायदेही होतात. गोल्फ कोर्सवर चालताना सरासरी पाच ते आठ किलोमीटर अंतर कापले जाते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि कॅलरी जळतात. नियमित गोल्फ खेळणाऱ्या व्यक्तींचे आयुष्य न खेळणाऱ्यांच्या तुलनेत सरासरी पाच वर्षांनी जास्त असू शकते, असेही नमूद करण्यात आले आहे. ताज्या हवेत चालण्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. निसर्गरम्य वातावरणात खेळल्याने मानसिक ताण कमी होतो, एकाग्रता वाढते आणि झोपही सुधारते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply