नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाची १८६वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी संस्थेच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात पार पडली. निवडणुकीपूर्वीची कार्यकारी मंडळाची ही अखेरची सभा असल्याने सभासदांचे किरकोळ आक्षेप वगळता सभा खेळीमेळीत पार पडली. सभेत सभासदत्वाचा मुद्दा, ग्रंथमोजणी, तसेच वाचनालयाच्या विविध कामांबाबत चर्चा झाली.
गुन्हा जोपर्यंत सिद्ध होत नाही, तोपर्यंत वैचारिक मतभेदातून कोणत्याही संस्थेमधून सभासदाचे सभासदत्व काढले जाऊ नये, अशी वैयक्तिक भूमिका अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी सभेत मांडली. वाचनालयाच्या सभासदत्वाला जी मंडळी मुकली आहेत, त्यांना सभासदत्व देण्यासाठी संचालक मंडळाचा अध्यक्ष म्हणून आपण तयार आहोत, मात्र त्यासाठी नियमांची पूर्तता करूनच सभासदत्व दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२० एप्रिलपासून सुरू केलेल्या ग्रंथमोजणीची, तसेच २०२४ मध्ये झालेल्या सभेत थकबाकीदार सभासदांसाठी राबविलेल्या ‘अभय’ योजनेची माहिती ग्रंथसचिव देवदत्त जोशी यांनी दिली. सभासदांकडे किती कालावधीपासून पुस्तके शिल्लक आहेत, याची माहितीही त्यांनी सादर केली. सभासद रमेश देशमुख, विनोद राठोड, सुहास भणगे, राजू देसले यांनी सभेत विविध सूचना केल्या. सुरुवातीला उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव यांनी स्वागत केले. श्रद्धांजली व अभिनंदनाचा ठराव जयेश बर्वे व देवदत्त जोशी यांनी मांडला. कार्याध्यक्ष संजय करंजकर यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. वार्षिक अहवाल प्रमुख सचिव गिरीश नातू यांनी सादर केला, तर अर्थसचिव प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी ताळेबंद, जमाखर्च व अंदाजपत्रक सादर केले; त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
सभेतील ठळक मुद्दे
मिनी थिएटर्स तीन महिन्यात पूर्ण होण्याची ग्वाही सभेत देण्यात आली. मुलांच्या पानसे अभ्यासिकेतील फर्निचर बदलण्यात येणार असून मुलींच्या अभ्यासिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी ‘नाशिक रन’कडून निधी मिळणार आहे. दोन लिफ्टसाठी महापालिकेची परवानगी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. नारायण सुर्वे आणि महात्मा फुले यांच्यावर डिसेंबरमध्ये एकदिवसीय कार्यक्रम होणार आहेत.
फिरते वाचनालय योजना बंद
प्रायोगिक तत्त्वावर डिसेंबर २०२३ मध्ये सुरू केलेले ‘लायब्ररी ऑन व्हील’ म्हणजे फिरते वाचनालय वाचकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बंद करण्यात आले आहे. मागणीपेक्षा खर्च अधिक झाल्याने ही योजना बंद करण्यात आली. त्याऐवजी संकेतस्थळ अद्ययावत करून वाचकांना हवी असलेल्या उपलब्ध पुस्तकांची माहिती एका क्लिकवर मिळावी, तसेच पुस्तक वाचकांपर्यंत घरपोच पोहोचविण्यासाठी ‘पोर्टर’सारख्या सुविधेचा लाभ घेता येईल का, याबाबत विचार सुरू आहे.
सभेत काही सभासदांनी सभासदत्व रद्द केलेल्या सभासदांना पुन्हा सभासद करून घेण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. अंतर्गत कायदेशीर वाद आणि न्यायालयीन घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सभासद वसंत खैरनार, श्रीकांत बेणी, रमेश जुन्नरे, दिवंगत सभासद मधुकर झेंडे व इतरांना दिलेले सभासदत्व रद्द करण्यात आले होते. रद्द झालेल्या सभासदांना जुने सभासदत्व अपेक्षित आहे, कारण पुढील वर्षी मे-जून महिन्यात संस्थेची निवडणूक आहे. नव्याने सभासदत्व दिल्यास घटनेच्या नियम ११ (आ) नुसार नवोदित सभासदांना कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत उभे राहण्याचा व मतदान करण्याचा अधिकार नसल्याचे सभेत नमूद करण्यात आले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply