सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

कागदपत्र पडताळणीसाठी ७० किमी प्रवास; मुखईकरांचा आक्षेप

शिरूर तालुक्यातील मुखई येथील २२८ नवमतदारांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ७० किलोमीटर दूर असलेल्या घोडेगाव येथे बोलावण्यात आले आहे. गावातच शिबिर घ्यावे, अशी मागणी करत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवले आहे.

कागदपत्र पडताळणीसाठी ७० किमी प्रवास; मुखईकरांचा आक्षेप

मुखई (ता. शिरूर) येथे नव्याने मतदार झालेल्या तब्बल २२८ ग्रामस्थांना त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ७० किलोमीटर दूर असलेल्या घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे सोमवारी (ता. २) बोलाविण्यात आले आहे. आंबेगाव हा आपला तालुका नाही, आपल्या गावापासून घोडेगाव जवळ नाही आणि थेट आदिवासी भागातील घोडेगावात जायला सांगितले जात आहे, हे आपल्याला मान्य नाही, असे म्हणत मुखईकर ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगालाच तसे पत्र पाठवले असून शिरुरकरांवरील अन्याय दूर करून गावातच शिबिर घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मुखई येथील २२८ जणांनी आपली नोंदणी मतदार म्हणून केलेली असून या सर्व मतदारांना त्यांची कागदपत्रे पडताळणीसाठी २ नोव्हेंबर रोजी घोडेगाव येथे बोलाविले असून तशा नोटिसा नुकत्याच गावातील सर्व नवमतदारांना दिल्या गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

शिरूर सोयीस्कर, घोडेगाव दूर असल्याचा आक्षेप

याबाबत ग्रामस्थांकडून आक्षेप नोंदविले गेले असून आपण शिरूर तालुक्याचे रहिवासी आहोत, आपल्याला शिरूर सोयीस्कर आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय २२८ जणांना एकाच वेळी आपल्यापासून ७० किलोमीटर दूर असलेल्या घोडेगावात बोलावून कागदपत्रे पडताळणी होणे शक्य नसताना त्रास देण्याच्या भूमिकेतून निवडणूक विभागाकडून नोटिसा देण्यात आल्याचे म्हणणे ग्रामस्थांनी मांडले. आपल्या एकाच गावातील अशा कागदपत्रे पडताळणी असलेल्या मतदारांची संख्या जास्त असल्याने ही पडताळणी शिबिर मुखईतच घेण्याची विनंती ग्रामस्थांनी केली असून तसे न केल्यास आपला थेट आक्षेप व हरकत असल्याची तक्रार थेट जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती सरपंच, माजी सरपंच व अन्य ग्रामस्थांनी दिली.

अधिकाऱ्यांकडून सोयीस्कर निर्णयाचे आश्वासन

कुणाही नवमतदारांना वा सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, अशीच आपली नेहमी भूमिका असते, असे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले. मुखई ग्रामस्थांच्या एवढ्या मोठ्या संख्येच्या मतदारांना बोलावून त्यांची कागदपत्रे पडताळणी शक्यतो सोयिस्कर ठिकाणी कशी शक्य होईल, याबाबत तहसिलदारांना योग्य ती सूचना करू आणि त्यानुसार ते उचित निर्णय घेतील, असे त्यांनी नमूद केले. तहसिलदारांनीही २२८ नवमतदारांना त्रास होणार नाही, असाच प्रयत्न सुरू असून शक्यतो मुखईतच शिबिर घेता येईल का, याची चाचपणी यंत्रणेकडून करत असल्याचे सांगितले. नायब तहसिलदारांनीही मुखई ग्रामस्थांच्या तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असून प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याशी बोलून योग्य तो निर्णय घेऊ, असे सांगितले. कुणालाही त्रास देण्याची भूमिका नसून प्रक्रियेनुसार योग्य ती भूमिका घेऊन मतदार नोंदणी कागदपत्रे पडताळणी करून घेऊ, असे त्यांनी नमूद केले.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance