औंध येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप केंद्राच्या वतीने बालक आणि १८ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींसाठी मोफत हृदयाची सोनोग्राफी तपासणी शिबिर झाले. या शिबिरात एकूण १२ बालकांची तपासणी झाली असून, त्यापैकी पाच बालके पुढील शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी पात्र ठरली आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज सुगावकर यांनी बालकांची तपासणी केली. हृदयविकार असलेल्या बालकांचे वेळेत निदान करून त्यांना आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिबिराच्या आयोजनासाठी बालरोग विभागप्रमुख डॉ. सुरेखा चावरिया, बालरोगतज्ज्ञ डॉ. सुचित्रा खेडकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. संध्या सिसोदिया, व्यवस्थापक डॉ. मीनाक्षी हबळे आणि सूर्यकांत शिळे यांच्यासह प्रारंभिक हस्तक्षेप केंद्र विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
दर महिन्याला दोन शिबिरे
जिल्हा रुग्णालय, औंध येथील प्रारंभिक हस्तक्षेप केंद्र विभागातर्फे यापुढे दर महिन्याला ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक आणि मुलांसाठी दोन वेळा मोफत २ डी-इको तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच गरजू बालकांना आणि मुला-मुलींना हृदयविकाराचे निदान आणि पुढील उपचार मिळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास डॉ. देवमाने यांनी व्यक्त केला.
वेळेत निदान झाले, तर हृदयविकारावर योग्य उपचार करणे शक्य होते. त्यामुळे अशा नियमित शिबिरांमुळे गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. मोफत तपासणीमुळे आर्थिक अडचणीमुळे तपासणी लांबणीवर पडण्याची शक्यता कमी होणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply