मावळ तालुक्यात भविष्यात उद्भवू शकणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनासाठी जुलै २०२७ पर्यंत लागणारा पाणीसाठा आरक्षित ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. तसेच पवना, इंद्रायणी आणि आंद्रा या नद्यांवरील नादुरुस्त कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पुढील दोन महिन्यांत दुरुस्त करण्याचे आश्वासन जलसंपदा विभागाने दिले आहे.
पुण्यातील विधानभवनात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत मावळ तालुक्यातील पाणीपुरवठा, शेतीचे सिंचन आणि उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन यावर चर्चा करण्यात आली. आमदार सुनील शेळके हे बैठकीला उपस्थित होते.
नदीकाठच्या गावांना दिलासा
पवना, इंद्रायणी आणि आंद्रा नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पुरेसे पाणी मिळावे, यासाठी नद्यांवरील नादुरुस्त कोल्हापुरी बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पुढील दोन महिन्यांत दुरुस्तीची कामे पूर्ण केली जातील, असे आश्वासन जलसंपदा विभागाकडून देण्यात आले. धरणांमधून गरजेनुसार पाणीसाठा उपलब्ध करून देण्याचे नियोजनही केले जाणार आहे.
पाणीटंचाई टाळण्यासाठी नियोजन
मावळ तालुक्यातील गावांसाठी जुलै २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनासाठी लागणारा पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. नदीकाठच्या गावांमधील पाण्याची उपलब्धता आणि शेतीची गरज लक्षात घेऊन जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन करण्यावर भर देण्यात आला आहे. दरम्यान, एल-निनोच्या संभाव्य परिणामामुळे पावसाच्या अनिश्चिततेबद्दल चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच शेतीसाठीही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध राहील, यासाठी नियोजन आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. नागरिक आणि शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणीबचतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply