बोगस वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी घोटाळ्याच्या विशेष तपास पथकाच्या चौकशीत वैयक्तिक मान्यता मिळालेल्या शिक्षकांच्या फायली मागवण्यात आल्या आहेत. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाकडून या फायली तपासून त्यावर योग्य किंवा अयोग्य असल्याचे शेरे मारले जात आहेत. बुधवारी सुमारे ३०० ते ३२५ फायलींवर सह्या करून त्या ऑनलाइन अपलोड करण्याचे काम सुरू होते.
विद्यानिकेतन विद्यालयात तपासणीचे काम
राज्यभर चर्चेत असलेल्या या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून वैयक्तिक मान्यतेच्या फायलींची तपासणी वेगाने सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतन विद्यालयात मंगळवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्यासह अधिकारी व कर्मचारी तपासणीच्या कामात गुंतले होते. तपास पथकाच्या आदेशानुसार फायलींतील कागदपत्रांची पूर्तता तपासून योग्य-अयोग्यचे शेरे मारणे आणि त्यानंतर फायली पुढे पाठवणे, अशा सूचना आहेत. बुधवारी दिवसभरात तीनशेहून अधिक फायली तपासून शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांवर सह्या केल्या; त्यानंतर संबंधित फायली ऑनलाइन अपलोड करण्यात आल्या.
आणखी ९८ मान्यता रद्दचे आदेश
दरम्यान, माध्यमिक शिक्षण विभागाकडून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचे आदेशपत्र संस्थाचालक व संबंधित शिक्षकांना देण्यास सुरुवात झाली आहे. वैयक्तिक मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले जात असून, बुधवारी ९८ आदेश प्राप्त झाले. उपशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत ते तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहेत. त्यानंतर हे आदेश संबंधित संस्थांकडे दिले जातील.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply