नाशिक शहरातील अंबडसह काही भागांतील बोअरवेलच्या पाण्यात क्रोमियमचे प्रमाण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर क्रोमियम उत्सर्जित करणाऱ्या कंपन्यांची महिनाभरात शंभर टक्के तपासणी पूर्ण करावी, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी यंत्रणांना दिले आहेत. भूजलासह पृष्ठभागावरील जलसाठ्यांमध्ये क्रोमियम आढळलेल्या ठिकाणांची व्याप्ती निश्चित करून प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजनांचा आराखडा तयार करावा, तसेच गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी कालबद्ध उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची बैठक
विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी गोदावरी नदी प्रदूषण नियंत्रण समितीची बैठक झाली, त्यावेळी डॉ. गेडाम बोलत होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त विठ्ठल सोनवणे, निरीचे वैज्ञानिक डॉ. गोयल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्यासह इतर अधिकारी प्रत्यक्ष हजर होते. गोदावरीत मिसळणाऱ्या सांडपाण्याची नियमित तपासणी करावी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ती तपासणी करावी, असेही गेडाम म्हणाले.
बाधित भागांत आरोग्य परीक्षणाचे निर्देश
अंबड परिसरातील दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला असण्याची शक्यता तपासण्यासाठी महानगरपालिकेने बाधित भागांत आरोग्य शिबिरे आयोजित करून नागरिकांचे आरोग्य परीक्षण करावे, असे निर्देश गेडाम यांनी दिले. क्रोमियमसह इतर जड धातू आणि जड धातूंव्यतिरिक्त असलेल्या प्रदूषकांचीही तपासणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply