काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘लोभस’ या पुस्तकाचे सोलापूरमध्ये प्रकाशन झाले. ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन कार्यक्रमात बोलताना खांडेकर यांनी शिंदे यांच्या जीवनप्रवासाची आठवण करून देत त्यांच्या प्रवासाकडे पाहिले की अब्राहम लिंकन यांची आठवण येते, असे मत व्यक्त केले.
मागील ३७ वर्षांच्या आपल्या पत्रकारितेच्या काळात विरोधी बातम्या लागल्या की नेत्यांचे फोन येतात, असे खांडेकर म्हणाले. मात्र अत्यंत जवळचे संबंध असतानाही कितीही विरोधी बातम्या लागल्या तरी ‘असं का केलं’ असं विचारणारा एकही फोन न केलेला नेता म्हणजे सुशीलकुमार शिंदे असल्याचे त्यांनी सांगितले. लोहपुरुष वल्लभभाई पटेल ज्या खुर्चीवर होते, त्याच खुर्चीवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेला नेता बसणे हे आपल्यासाठीही भावनिक असल्याचे खांडेकर म्हणाले.
लिंकन आणि शिंदे यांच्या जीवनातील साम्य
सुशीलकुमार शिंदे हे प्रचंड मेहनती होते, पण नियतीनेच त्यांना इथपर्यंत पोहोचवायचे ठरवले होते, असे खांडेकर म्हणाले. फुगे विकणारा मुलगा पट्टेवाला झाला तिथे थांबायला हवा होता. लाखो लोकांचे स्वप्न असलेले पोलीस उपनिरीक्षक पदही त्यांनी मिळवले, पण तिथेही ते थांबले नाहीत. वयाच्या ३२ व्या वर्षी ते आमदार झाले आणि वर्षभरात मंत्रीही झाले. राजकीय वारसा नसलेला व्यक्ती वयाच्या ३३ व्या वर्षी राज्याचा मंत्री होतो हे विस्मयकारक असल्याचे खांडेकर म्हणाले.
सुशीलकुमार शिंदे आपल्या दोन आईंबद्दल प्रेमाने बोलतात, तसेच अब्राहम लिंकन यांनाही दोन आई होत्या. शिंदे यांनी कधीच विरोधकांचाही द्वेष केला नाही, तर लिंकन यांनी विरोध केलेल्या लोकांनाही मंत्रीमंडळात घेतले होते, असे खांडेकर यांनी नमूद केले. शिंदे यांच्या प्रवासाकडे बघताना काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या नियती ठरवते, असेही ते म्हणाले.
प्रत्येक मंत्रीपदाच्या काळात वैशिष्ट्यपूर्ण काम
सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या प्रत्येक मंत्रीपदाच्या काळात वैशिष्ट्यपूर्ण काम केल्याचे खांडेकर म्हणाले. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग आहेत, त्याबद्दल ते बोलले तर संपूर्ण महाराष्ट्राला ऐकायला आवडेल, असेही ते म्हणाले. कसाबला फाशी दिली तेव्हा मध्यरात्री दोन वाजता फोन केला असता शिंदे यांनी पहिल्याच रिंगला फोन घेतला आणि ‘सकाळी सांगतो’ असे उत्तर दिल्याची आठवणही खांडेकर यांनी सांगितली. शिंदे यांच्या मोकळ्या ढाकळ्या वक्तव्यांमुळे काही वेळा वाद होतात, पण एखाद्याने दिलेला सल्ला ऐकण्याचा त्यांचा स्वभाव असल्याचेही ते म्हणाले.
विरोधक कुठल्याही पातळीवर गेले तरी शिंदे यांनी आपल्या मर्यादा सोडल्या नाहीत. २००४ साली मुख्यमंत्री पदावर पूर्ण अधिकार असतानाही चेहऱ्यावर कसलीही कटूता न आणता ते विलासराव देशमुख यांना स्वतः घेऊन आले. त्यांच्यातील सकारात्मक गुणांमुळेच त्यांना यश मिळत गेले. ‘लोभस’ पुस्तकातून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत, पण शिंदे यांची सकारात्मकता या पुस्तकातून घेतली पाहिजे, असे आवाहन खांडेकर यांनी केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply