शिरपूर तालुक्यातील सावळदे येथे शेतात जाळी लावून कुंपणात बंद केलेल्या ४२ मेंढ्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (२४ ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. चोरीला गेलेल्या मेंढ्यांची किंमत सुमारे सहा लाख ३० हजार रुपये आहे.
कशी घडली घटना
सावळदे शिवारातील सुभाष छगन पाटील यांच्या शेतात ही घटना घडली. वाघापूर (ता. साक्री) येथील बापू काशीराम भोरकर हे कुटुंबासह दोन दिवसांपासून मेंढ्या चराईसाठी या शेतात दाखल झाले आहेत. तेथे झोपडी बांधून मुक्कामी थांबत त्यांनी मेंढ्यांसाठी जाळीचे कुंपण लावून तात्पुरता वाडा केला होता. भोरकर यांनी शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) रात्री २५० मेंढ्या चारून आणल्यानंतर त्या कुंपणात बंदिस्त केल्या. रात्री जेवण करून कुटुंब झोपी गेले. शनिवारी सकाळी उठून मोजणी केल्यावर एका वाड्यातील ४२ मेंढ्या चोरीस गेल्याचे दिसून आले.
पोलिसांत तक्रार
मेंढ्या कमी असल्याचे कळताच भोरकर यांनी परिसरात शोध घेतला, मात्र मेंढ्यांचा मागमूस लागला नाही. घटनास्थळाजवळ वाहनाच्या टायरच्या खुणाही आढळल्या. चोरट्यांनी वाड्याची जाळी कापून मेंढ्या चोरल्याचे आढळले. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून संशयितांचा शोध घेण्याची मागणी केली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply