देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि मतदारयादी विशेष पुनरिक्षण प्रक्रिया (एसआयआर) तातडीने रद्द करावी, या मागण्यांसाठी नाशिकमध्ये विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी शनिवारी मोर्चा काढला. मोर्चानंतर जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
देशभरात सध्या एसआयआरचा मुद्दा चर्चेत आहे. या प्रश्नावर ‘लोकशाही वाचवा’ या भूमिकेतून शहरातील विरोधी पक्ष व सामाजिक संघटनांनी मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांच्या मते, ही प्रक्रिया लोकशाही मूल्यांना आणि नागरिकांच्या मतदानाच्या मूलभूत हक्काला धक्का लावणारी आहे. या प्रक्रियेत मतदारयाद्यांमधून सुमारे १३ कोटी नागरिकांची नावे संशयास्पदरीत्या वगळली गेल्याने ते मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची भीती असल्याचा आरोप करण्यात आला.
निवडणूक आयोगातील इतर आयुक्तांनी या कार्यपद्धतीवर १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवूनही त्याची दखल का घेतली गेली नाही, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. तसेच वय आणि पत्त्यातील विसंगतीचे कारण देत लाखो मतदारांना नोटिसा पाठवून मानसिक त्रास दिला जात असल्याचेही मोर्चेकऱ्यांनी म्हटले.
सीबीएस ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा
सीबीएस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. शिवाजी रोड, नेहरू गार्डन, महात्मा गांधी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचा समारोप झाला. त्यानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन दिले. खासदार डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेसचे शहराध्यक्ष नीलेश खैरे, जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे व भारत टाकेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष छबू नागरे, भाकपचे डी. एल. कराड, राजू देसले, मनसेचे राकेश परदेशी यांच्यासह विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
जोरदार घोषणाबाजी
मोर्चात काँग्रेस, माकप, भाकप, मनसे, आम आदमी पक्षासह विविध पक्ष व संघटना सहभागी झाल्या होत्या. ‘ज्ञानेश कुमार राजीनामा द्या’ अशा घोषणा मोर्चेकऱ्यांनी दिल्या. एसआयआर प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, आयुक्तांचा राजीनामा घ्यावा आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply