जुन्या नाशिकमध्ये शनिवारी देखभाल-दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहराच्या बहुतांश भागात सकाळचा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. अनेकांना आगाऊ पाणी साठवणे शक्य झाले नाही, त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी काही भागातील नागरिकांना दिवसभर भटकंती करावी लागली. काही सोसायट्यांनी टँकर मागवले, तर काही भागात नगरसेवकांच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तरीही अनेक नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले.
खोदकामादरम्यान फुटली पाइपलाइन
एकीकडे नागरिक पाण्यासाठी त्रस्त असताना, दुसरीकडे दहिपूल परिसरातील कानडे मारुती मंदिरासमोर भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू होते. खोदकामादरम्यान ड्रिलिंगच्या धक्क्याने पाण्याची मुख्य पाइपलाइन फुटली आणि लाखो लिटर पाणी वाया गेले. कानडे मारुती लेन कॉर्नर ते गाडगे महाराज पुलापर्यंत रस्त्यावरून पाणी वाहत थेट नदीपात्रात जाऊन मिसळले. परिणामी, परिसरातील रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले होते.
नागरिकांची नाराजी
पाण्याची टंचाई जाणवत असताना दुसरीकडे अशा प्रकारे लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक नागरिकांनी पाइपलाइन फुटल्याने वाया जाणारे पाणी आणि रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर प्रसारित केले. तसेच, महापालिका आणि संबंधित विभागाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply