लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ‘पोलिस आपल्या गावामध्ये’ हा उपक्रम राबवला जात आहे. जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत निर्माण होणाऱ्या समस्यांचा वेळीच अंदाज घेऊन त्यांचा सामना करण्यासाठी नागरिकांना सज्ज करणे, तसेच ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील २७९ गावांना भेटी देऊन १४ हजार २२ नागरिकांशी पोलिसांनी प्रत्यक्ष संवाद साधला आहे.
गावोगावी प्रत्यक्ष संवाद
या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिस अधिकारी व अंमलदार गावांना प्रत्यक्ष भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान ग्रामस्थ, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. आगामी काळात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कोणत्या स्वरूपाच्या अडचणी निर्माण होऊ शकतात, त्याचा नागरिकांच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. नागरिक आणि पोलिस यांच्यातील समन्वय वाढवण्यासोबतच गावपातळीवरच संभाव्य समस्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर या उपक्रमात भर देण्यात येत आहे.
ग्रामसुरक्षा दल आणि रात्रीची गस्त
या उपक्रमात गावातील सामाजिक भान असलेल्या, होतकरू आणि उत्साही तरुणांचा ग्रामसुरक्षेसाठी सहभाग वाढवला जात आहे. ज्या गावांना पोलिसांनी भेटी दिल्या आहेत, त्या गावांमध्ये स्थानिक तरुणांच्या सहकार्याने ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली असून त्यामार्फत रात्रीची गस्त घातली जात आहे. लोकसहभागातून प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला जात आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी पोलिस आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून गावाची सुरक्षितता अधिक बळकट होईल, असा संदेश या उपक्रमातून दिला जात असल्याचे सांगितले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply