
Nashik मालेगावात भेळभत्तातून विषबाधा १४० हून अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल
Apla Nashik मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील आठवडे बाजारात भेळभत्ता खाल्ल्यानंतर नागरिकांना विषबाधेचा त्रास झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सुरुवातीला १४० हून अधिक जण बाधित झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आरोग्य विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार बाधितांची संख्या १८६ वर पोहोचली आहे. (NASHIK)

आठवडे बाजारात भेळभत्ता आणि चटणी खाल्ल्यानंतर अनेक नागरिकांना उलटी, जुलाब आणि मळमळ यासारखा त्रास सुरू झाला. रुग्णांची संख्या वाढल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आणि बाधित नागरिकांना मालेगाव येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार, भेळभत्त्यासोबत देण्यात आलेल्या चटणीमुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चटणीसह भेळभत्ता खाल्लेल्या नागरिकांनाच त्रास झाल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले असून, चटणीशिवाय भेळ खाल्लेल्या नागरिकांना असा त्रास झाला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
बाधित रुग्णांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश आहे. सध्या मालेगाव येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, बहुतांश रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. एका बालकाची प्रकृती खालावल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, भेळभत्ता आणि चटणीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणीच्या अहवालानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. घटनेनंतर गावात आरोग्य विभागाची पथके तैनात करण्यात आली असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात अमरावतीत युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात ज्ञानेश कुमार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढत निषेध करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मतदार यादी आणि SIR प्रक्रियेबाबत काँग्रेसकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आवाहनानुसार विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शनं आणि मोर्चे काढण्यात आले.
अमरावतीमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पद्धतीने आंदोलन करत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली. आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, SIR आणि मतदार यादीतील बदलांबाबत काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे, निवडणूक आयोगाने आपल्या प्रक्रियेबाबत कायदेशीर चौकटीत काम होत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
अमरावतीतील या आंदोलनामुळे SIR प्रक्रियेवरून सुरू असलेल्या राजकीय वादाला पुन्हा धार आली आहे. या मुद्द्यावर पुढील काळात काँग्रेस आणि निवडणूक आयोगाकडून कोणत्या भूमिका मांडल्या जातात, याकडे लक्ष लागलं आहे.

