पारनेर येथील महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कक्षाच्या वतीने कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींचा सहभाग होता. आधुनिक युगात महिलांनी केवळ पदवीपर्यंत शिक्षण घेऊन थांबू नये, तर व्यावहारिक आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करून स्वावलंबी व्हावे, हा या उपक्रमामागचा उद्देश होता.
रोजगाराच्या नव्या संधी
या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या दृष्टीनेही हे प्रशिक्षण महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर होते. आजच्या स्पर्धात्मक युगात महिलांचे आर्थिक स्वावलंबन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या अभ्यासक्रमातून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनी स्वतःच्या कौशल्याच्या बळावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील आणि पूर्ण आत्मविश्वासाने समाजात वावरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी समन्वयक डॉ. दत्तात्रय घुंगार्डे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. हरेश शेळके आणि पर्यवेक्षक प्रा. श्यामराव घनघाव प्रमुख उपस्थितीत होते. प्राध्यापिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक डॉ. सरिता कुंडलीकर यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. माया लहारे यांनी केले, तर आभार प्रा. दीपाली सातपुते यांनी मानले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. सायली सोनवणे आणि प्रा. अदिती जेजूरकर यांनी परिश्रम घेतले.
Leave a Reply