माकड दुकानात शिरले की वस्तूंची वाट लागलीच, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. पण एका माकडाने असा काही प्रताप केला आहे की तो पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि हसून लोटपोट व्हायला झाले आहे. मोबाईलच्या दुकानात शिरलेल्या त्या माकडाने दुकानदाराला थेट जादूची झप्पीच दिली आहे. त्याचा व्हिडिओ काही सेकंदांतच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
दुकानातील नेमका प्रसंग
व्हायरल व्हिडिओमध्ये एक माकड मोबाईलच्या दुकानात शिरताना दिसते. त्यावेळी दुकानात दोघे जण काम करत होते. त्यातील एक जण गल्ल्याजवळ बसला होता. समोरच्या रस्त्यावरून आलेले माकड दुकानात शिरले. दोघांनाही आधी वाटले की हे माकड आता नुकसान करूनच जाणार. पण ते माकड अचानक गल्ल्याजवळ बसलेल्या मुलाजवळ गेले आणि त्याला थेट मिठी मारली. तो मुलगाही माकडाला न हाकलता मिठी मारू देत होता, जणू काही रोज भेटणारा मित्रच! हे सगळे पाहून दुकानातील दुसऱ्या मुलाची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडालेली दिसते. हा सगळा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
माकड सहसा मानवी वस्तीत घुसत नाही आणि घुसलेच तर नासधुस केल्याशिवाय सोडत नाही. त्यामुळे प्रेम करणारे माकड पाहायला मिळाल्याने नेटकऱ्यांमध्ये याची जोरदार चर्चा रंगली आहे. कोणी म्हणते आहे की हे माकड दुकानदाराला आधीपासून ओळखत असावे, तर कोणी म्हणते आहे की ते मोबाईल घेण्यासाठी आले आहे. त्याच्या या अनपेक्षित कृतीमुळे व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला आश्चर्य वाटत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply