स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या बीड शहरात सध्या वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. काही महिन्यांपूर्वी शहरातील प्रमुख चौकांमध्ये बसविण्यात आलेले स्वयंचलित वाहतूक सिग्नल निकृष्ट कामामुळे वादात सापडले होते. नगरपालिकेने संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करून हे सिग्नल हटविले. मात्र, आता या रिकाम्या चौकांमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
६४ लाख खर्चूनही सिग्नल टिकले नाहीत
वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मार्च २०२६ मध्ये शहराच्या चार प्रमुख चौकांमध्ये ६४ लाख रुपये खर्च करून स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अण्णा भाऊ साठे चौक, नगर नाका आणि शिवराज पान सेंटर चौक या वर्दळीच्या ठिकाणांचा यात समावेश होता. मात्र, सिग्नल बसविल्यानंतर काही दिवसांतच एप्रिल महिन्यातील पहिल्याच पावसात नगर नाक्यावरील दुभाजकात बसवलेले सिग्नल एका बाजूला कलंडले. सिग्नलचा ढाचा रस्त्याच्या मधोमध दुभाजकात योग्य प्रकारे न बसविल्याने आणि माती सैल झाल्यामुळे हा प्रकार घडला.
या गंभीर प्रकाराची दखल घेत बीड नगरपालिकेने आक्रमक भूमिका घेतली. संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करत त्याला १० टक्के दंड ठोठावण्यात आला. दिलेली वर्क ऑर्डर रद्द करून चारही चौकांतील बसवलेले सर्व सिग्नल काढून घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले.
नव्याने निविदेलाही ठेकेदारांचा प्रतिसाद नाही
सिग्नल यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात पुन्हा नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, पालिकेच्या कडक कारवाईचा धसका घेतल्यामुळे एकाही ठेकेदाराने या कामासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे प्रशासनाला आता पुन्हा नव्याने निविदा काढण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, शहरातून जाणाऱ्या अहिल्यानगर-परळी रस्त्याचे काम तीन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. चऱ्हाटा फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरील काम रखडल्याने वाहनचालकांना आधीच मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बार्शी नाका यादरम्यान रस्तेकाम सुरू असल्याने आणि चौकांतील सिग्नल हटविल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व सिग्नल यंत्रणा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबवून प्रयत्न सुरू असल्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply