उत्तर प्रदेशातूनही मतदारयादीचा घोळ समोर आला आहे. तेथील मतदारांच्या नावांमध्ये मोठ्या चुका उघडकीस आल्या आहेत. मतदारांच्या आणि त्यांच्या वडिलांच्या नावांच्या जागी विचित्र व अर्थहीन शब्द लिहिलेले दिसत आहेत. या प्रकारानंतर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. आमदार रोहित पवार यांनीही निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली आहे.
रोहित पवारांनी काय म्हटले?
रोहित पवार यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत म्हटले की, उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद-झाशी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाचा धक्कादायक कारभार समोर आला आहे. मतदारांच्या नावांच्या जागी चुकीची वाक्ये, तर काही मतदारांच्या वडिलांच्या नावाच्या जागी ‘बी. कॉम’ असे लिहिलेले आढळले आहे.
त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही निशाणा साधला आणि एवढा गलथान कारभार केवळ त्यांनाच शोभतो, अशा शब्दांत टीका केली. लोकांचे बारसे घालण्याचे काम करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर, त्यांनी राबवलेल्या एसआयआर मोहिमेवर आणि त्यांनी घेतलेल्या निवडणुकांवर कसा विश्वास ठेवायचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अलीकडेच घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे उत्तर प्रदेशात समोर आलेल्या घटनांमुळे सिद्ध झाल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच निवडणूक आयोगाचा अघोषित प्रवक्ता असलेल्या भाजपने यावर उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
प्रशासनाचे स्पष्टीकरण काय?
उत्तर प्रदेशात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. जाब विचारल्यानंतर सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे या चुका घडल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार विधान परिषद निवडणुकीसाठी प्रथमच ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आल्याने या चुका घडल्या आहेत.
आता रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते काय प्रत्युत्तर देतात, याकडे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply