देशातील तरुण मोठी स्वप्ने पाहत आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. मात्र अमली पदार्थांचे व्यसन हे त्यांच्या स्वप्नांच्या वाटेतील सर्वात मोठे अडथळे ठरत असल्याची चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. रविवारी आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १४० व्या भागात त्यांनी हा विषय मांडला.
व्यसनाच्या विरोधात समाजात जागृती वाढत असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. ‘नशामुक्त युवा अभियान’ या उपक्रमाला गती मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तरुण पिढी व्यसनापासून दूर राहावी, यासाठी समाजाच्या सर्व स्तरांतून प्रयत्न होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
व्यसनमुक्त तरुणाशी थेट संवाद
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील एका व्यसनमुक्त झालेल्या तरुणाशी थेट संवाद साधला. त्या तरुणाने आपला अनुभव सांगताना सांगितले की, दहावीत शिकत असताना मित्रांच्या संगतीमुळे त्याला व्यसन लागले. या व्यसनामुळे त्याला आई, आजी आणि संपूर्ण कुटुंब गमवावे लागले.
पुनर्वसन केंद्रात दाखल झाल्यानंतरही तो तीन वेळा पुन्हा व्यसनाकडे वळला. मात्र केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण मदतीमुळे अखेर त्याने व्यसनावर मात केली. त्याच्या या जिद्दीचे पंतप्रधानांनी कौतुक केले. इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नसते, असे सांगत त्यांनी त्या तरुणाला इतरांनाही व्यसनातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवण्याचे आवाहन केले.
नशामुक्त अभियानाची अंमलबजावणी
या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील २० प्रशासकीय विभागांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सहा प्रमुख मुद्द्यांवर आधारित २१ कृती मुद्दे निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय ‘एनकॉर्ड’ समित्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी ४० निकष आणि एकूण ६५० गुणांची प्रणाली तयार करण्यात आली आहे.
प्रत्येक विभागाच्या कामाचे नियमित मूल्यमापन केले जाणार असून, चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. या कामात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा