संसदेच्या विशेष अधिवेशनाला प्रारंभ होण्याच्या पूर्वसंध्येला रविवारी देशाच्या राजकारणाचा नूर पालटणाऱ्या मोठ्या घडामोडी घडल्या. परिसीमन (मतदारसंघ पुनर्रचना) आणि महिला आरक्षण ही दोन विधेयके या अधिवेशनात मांडली जाणार असून, विविध प्रादेशिक पक्षांनी विधेयकाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे सरकारची बाजू भक्कम झाली आहे आणि विरोधकांच्या आघाडीत फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे.
सरकारचा ३७१ संख्याबळाचा दावा
लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवण्याशी संबंधित परिसीमन विधेयक आणि महिला आरक्षणावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरपारची लढाई पराकोटीला पोहोचली आहे. सहा महिन्यांपूर्वी (एप्रिल २०२६) विधेयकाला अवघ्या २९८ खासदारांचा पाठिंबा मिळाल्यामुळे पराभवाचा सामना करावा लागलेल्या केंद्र सरकारने आता सुधारित विधेयक संसदेसमोर आणताना तब्बल ३७१ खासदारांचा पाठिंबा मिळत असल्याचा दावा रविवारी केला. दुसरीकडे विरोधकांचे संख्याबळ घटून १७५ वर आल्याचे चित्र समोर आले आहे. दोन तृतीयांश बहुमतासाठी ३५८ मते लागतात. त्यामुळे सभागृहातील गोंधळ आणि विरोधकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवरही विधेयक मंजूर करून घेण्यात अडचण येणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे.
स्टॅलिन यांनी फेटाळली विरोधकांची विनंती
परिसीमन विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी शुक्रवारी जाहीर केली होती. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी रविवारी तातडीने चेन्नई गाठून स्टॅलिन यांची भेट घेत त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेस व इंडिया आघाडीच्या नेत्यांची विनंती फेटाळून लावत स्टॅलिन यांनी हे विधेयक पराभूत झाल्यास दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय होईल, असे सांगत विधेयकाला पाठिंबा देण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), बीआरएस, वायएसआरसीपी आणि अण्णाद्रमुक (एआयएडीएमके) या पक्षांनीही विधेयकाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. लोकसभेत सहा खासदार असलेला झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षानेही आता या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त रविवारी दिवसभर सुरू होते. या पक्षाकडून आतापर्यंत याबाबत थेट वक्तव्य केले गेले नसले तरी सोमवारी विधेयक मांडणीनंतर हा पक्ष सरकारच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना (दोन्ही गट), आपसह सर्वच प्रमुख पक्षांनी आपापल्या खासदारांना व्हिप बजावून अधिवेशन काळात संसदेत हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. स्टॅलिन यांच्या भेटीनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला की, ८५० जागांची लोकसभा तयार करून भाजपला मतदारसंघांची रचना बदलण्याची मुभा दिल्यास देशातील लोकशाही संपुष्टात येईल आणि याचा फटका दक्षिण भारतासह तामिळनाडूला बसेल.
प्रतिक्रिया व्यक्त करा