सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करताना तेथील प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी मांडली. रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले तरुण पुन्हा मायभूमीत परतावेत, यासाठी राबवण्यात येत असलेले रिव्हर्स मायग्रेशनचे अभियान यशस्वी करायचे असेल, तर जिल्ह्यातील दरडोई उत्पन्नात वाढ होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
सिंधुदुर्गनगरी येथे सिंधुदुर्ग बँकेच्या सभागृहात जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात राणे बोलत होते. या वेळी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांच्यासह महेश पोहनेरकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, प्रणय तेली, प्रसाद देवधर, संध्या तेरसे, महेश ठाकूर, अशोक सारंग आणि महेश गोखले आदी तज्ज्ञ मंडळी उपस्थित होती.
दरडोई उत्पन्न वर्षाला ५० हजारांनी वाढवण्याचा आराखडा
जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी एकत्र येऊन जिल्ह्याचा विकास कसा करावा, याबाबत आपली मते मांडावीत, असे आवाहन राणे यांनी केले. सरकारच्या वतीने पालकमंत्री म्हणून विकासासंबंधीच्या सूचना अमलात आणण्याची हमी त्यांनी दिली. मात्र जिल्ह्याच्या विकासाचे खरे उद्दिष्ट तेथील लोकांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांचे दरडोई उत्पन्न वाढवणे हेच असायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले. कृषी, आरोग्य, शिक्षण आणि उद्योग या क्षेत्रांतील विकास दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने व्हायला हवा, असे ते म्हणाले. सध्या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न अडीच लाख रुपये इतके असून ते दरवर्षी ५० हजार रुपयांनी कसे वाढेल, याचा आराखडा सर्वांनी मिळून तयार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
जहाजबांधणी उद्योगातून हजारो रोजगार निर्मिती
रिव्हर्स मायग्रेशन ही अतिशय महत्त्वाची मोहीम असल्याचे सांगून राणे म्हणाले, रोजगारासाठी बाहेर गेलेला तरुण जिल्ह्यात परत यावा आणि जिल्ह्यातील शिकलेल्या तरुणाला इथेच नोकरी मिळावी, यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. शिरोडा येथील ताज हॉटेल प्रकल्प आणि कुणकेश्वर येथील पंचतारांकित हॉटेल प्रकल्प याच उद्देशाने उभारले जात आहेत. केवळ पर्यटन, कृषी आणि मासेमारी यावरच आर्थिक विकास अवलंबून ठेवून चालणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. गोव्याप्रमाणे जहाजे बांधणारे कारखाने जिल्ह्यात उभे करावे लागतील आणि त्या दिशेने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तळवणे येथे असा प्रकल्प सुरू झाला असून लवकरच देवगड येथेही तो सुरू होणार आहे. जहाजबांधणीच्या उद्योगांमध्ये हजारोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा पूर्णत्वाकडे चालल्या असून त्या अधिक मजबूत करणे आणि दर्जेदार रोजगाराची जास्तीत जास्त निर्मिती करणे, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही राणे यांनी सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा