, ३० नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

850 खासदार केले तर खर्च कोणाला झेपणार? उद्धव ठाकरेंचा सवाल

उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनीही देशहिताचा विचार करावा, असे आवाहन केले. 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार आणि तो कोणाला झेपणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

850 खासदार केले तर खर्च कोणाला झेपणार? उद्धव ठाकरेंचा सवाल

डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर देशातील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्याची माहिती समोर येत असून पक्षाच्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी याबाबत वक्तव्ये केली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मलाही जाता आले नसते का, मलाही निरोप आले नसतील का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मात्र पक्षहितापेक्षा महाराष्ट्राचे हित पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांनीही देशहिताचा विचार करायला हवा, असे आवाहन त्यांनी केले. शाहू, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचा विचार हाच आहे, असे ते म्हणाले. ही घटनात्मक प्रक्रिया असली तरी ती आता दुर्घटनात्मक होत चालल्याचे त्यांनी म्हटले.

महिलांना 33 टक्के आरक्षण 534 मध्ये द्या

महिलांना फसवले जात असल्याचा आरोप करत, महिलांना 33 टक्के आरक्षण 534 जागांमध्ये द्यावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेनेच्या नऊ खासदारांना पक्षादेश दिला असून मतदान कसे करायचे, याबाबत सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. 2017 मध्ये मुंबई महापालिकेत डिलिमिटेशन कसे केले गेले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ती एक रंगीत तालीम होती, असे त्यांचे म्हणणे आहे. महापालिकेत आपल्या आजूबाजूचे वॉर्ड जिंकून यायचे, असे त्यांनी सांगितले. जातीनुसार आणि धर्मानुसार मतदान कापले जाणार असल्याचा आरोप त्यांनी केला.

850 खासदार केले तर खर्च किती वाढणार?

आता 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार आणि तो कोणाला झेपणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. हजर आणि गैरहजर राहणाऱ्या खासदारांची हजेरी घ्यावी, असे ते म्हणाले. एक खासदार 15 लाखांच्या मतदारसंघाला पुरेसा पडत नसेल, तर 150 कोटींच्या जनतेला एक पंतप्रधानही पुरत नसेल, असा टोला त्यांनी लगावला. आताच्या सभागृहात एक अध्यक्ष असून त्यांना ते हाताळता येत नाही, मग दोन-चार अध्यक्ष बसवणार का, असा सवालही त्यांनी केला.

सदस्यसंख्या वाढवत असताना पारदर्शकता असायला हवी, असे ठाकरे म्हणाले. ज्ञानेश कुमार आम्हाला नको आहेत, तसेच निवृत्त न्यायाधीश कोण असावेत, याबाबत अनेक नावे दिली असली तरी त्यांचा पुरस्कृत माणूस नको, अशी भूमिका त्यांनी मांडली. तिसरा माणूस ज्ञानेश कुमार आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance