लोकसभेत मांडले जाणार असलेले मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयक सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहे. या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा असल्याचे बोलले जात असताना आमदार रोहित पवार यांनी मात्र उघड विरोधाची भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून विधेयकाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे.
पक्षातील ‘खंडोजी खोपडे’वर रोहित पवारांचा निशाणा
पक्षातील काही नेत्यांनी विधेयकाला पाठिंबा असल्याचे संकेत दिले असून आपल्याच पक्षातील खंडोजी खोपडेला भाजपने हाताशी धरल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. विधेयकाला पाठिंबा देण्याच्या चर्चेमुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्रासाठी आणि देशाच्या हितासाठी तसेच पुरोगामी विचारांसाठी आयुष्यभर काम केलेल्या शरद पवार यांच्यावर अशी टीका होत असल्याचे पाहून वेदना होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. शरद पवार आजारी असल्याने ते स्वतः भूमिका मांडू शकत नाहीत, असेही पत्रात म्हटले आहे.
डिलिमिटेशनमधून संविधान बदलण्याचा प्रयत्न?
डिलिमिटेशनच्या माध्यमातून आपल्या सोईचे मतदारसंघ तयार करून संविधान बदलण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. २०२४ मध्ये भाजपच्या अनेक नेत्यांनी ४०० पारचा नारा दिला होता, पण जनतेने त्यांना गुडघ्यावर आणल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या जनगणना सुरू असून त्याआधारे २०२७ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे. मग भाजपकडून आता एवढी घाई का केली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या मदतीने मतचोरी करून भाजपने अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण यांचा काहीही संबंध नसून महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्येच संसदेत मंजूर झाले आहे आणि त्याला आपल्या पक्षाने पाठिंबा दिला होता, पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा