मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. भेटीनंतर बाहेर पडताना राहुल गांधी यांनी आमच्यात चर्चा सुरू आहे, सर्व काही ठीक आहे आणि लढाई सुरूच राहील, असे सूचक वक्तव्य केले.
पवारांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही
या भेटीत राहुल गांधी यांच्यासह राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, ममता बॅनर्जी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते सहभागी झाले होते. डिलिमिटेशन विधेयकाला का विरोध करायला हवा, याबाबत नेत्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार पवार यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी सर्व नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले, पण स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे उद्या होणाऱ्या विशेष अधिवेशनात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका विधेयकाच्या बाजूने असेल की विरोधात, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
विधेयकावरून आघाडीची मनधरणी
नेत्यांनी पवार यांना सांगितले की, हे विधेयक देश आणि लोकशाहीच्या विरोधात आहे आणि इंडिया आघाडी म्हणून भविष्यात यामुळे विरोधी पक्षांना मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे इंडिया आघाडीच्या भूमिकेला साथ द्यावी, यासाठी नेत्यांनी पवार यांची मनधरणी केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी तसे संकेत दिले आहेत, असेही सांगितले जात आहे. मात्र पवार यांनी स्वतः याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे आघाडीच्या नेत्यांची ही भेट आणि त्यानंतर राहुल गांधी यांचे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा