वाई तालुक्यातील चिखली येथील आंबेडकर नगरमधील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीला संरक्षण भिंत आणि पाइपलाइनच्या दहा लाख रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन झाले. त्यामुळे आंबेडकर नगरच्या पाणीप्रश्नातून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
भूमिपूजनप्रसंगी युवानेते रोहित वाडकर यांनी जनतेचे प्रश्न केवळ मांडायचे नाहीत, तर ते सोडवण्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करायचा, ही आपल्या कामाची पद्धत असल्याचे सांगितले. ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच आपल्या प्रयत्नांचे खरे फलित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी
चिखलीच्या आंबेडकर नगरमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत रोहित वाडकर यांनी जुन्या विहिरीपासून आवश्यक पाइपलाइनचे काम पूर्ण करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. मात्र, संबंधित विहीर ओढ्यालगत असल्याने ओढ्यातील दूषित पाणी विहिरीत मिसळण्याची शक्यता होती. त्यामुळे विहिरीला ओढ्यापासून संरक्षण देण्यासाठी भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
निधीसाठी सहकार्य
ना. जयकुमार गोरे तसेच आ. धैर्यशील कदम यांनी सहकार्य केल्यानेच या दोन्ही कामांसाठी निधी उपलब्ध झाला, असे वाडकर यांनी सांगितले. यापुढेही यशवंतनगर गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सरपंच वैशाली मांढरे, उपसरपंच मारुती वाडकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विजय वाडकर, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ यादव, मेघा सपकाळ, चिखली विकास सेवा सोसायटीचे संचालक नामदेव मांढरे, माजी चेअरमन संजय वाडकर आणि पोलीस पाटील छाया सोनावले यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रतिक्रिया व्यक्त करा