हिवाळा आला की सकाळी किंवा रात्री बाहेर पडताना आपल्या तोंडातून पांढरी वाफ बाहेर पडताना दिसते. ती अगदी धुरासारखी दिसते. अनेकांना प्रश्न पडतो की ही वाफ नेमकी काय असते आणि ती फक्त थंडीतच का दिसते. यामागे एक साधी वैज्ञानिक प्रक्रिया आहे. तिला सांद्रीभवन असे म्हणतात.
## श्वासातील वाफ नेमकी काय असते?
आपल्या फुफ्फुसांचा आणि श्वसनमार्गाचा आतील भाग नेहमी ओलसर असतो. आपण श्वास घेतो तेव्हा हवा या ओलाव्यातून जाते आणि शरीराच्या तापमानाइतकी गरम होते. त्यामुळे आपण बाहेर सोडलेली हवा उबदार असते आणि तिच्यात पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात असते. या वाफेतील आर्द्रता जवळजवळ शंभर टक्के असते. पाण्याची वाफ ही वायुरूपात असल्याने ती डोळ्यांना दिसत नाही. कोणत्याही ऋतूत आपल्या श्वासात पाणी असते. फक्त ते नेहमी डोळ्यांना दिसतेच असे नाही.
## थंडीतच वाफ का दिसते?
या वाफेमागचे खरे कारण हवेच्या पाणी साठवून ठेवण्याच्या क्षमतेत दडलेले आहे. उबदार हवा जास्त आर्द्रता धरून ठेवू शकते, तर थंड हवेची क्षमता कमी असते. हिवाळ्यात आपला उबदार आणि आर्द्रतेने भरलेला श्वास थंड हवेच्या संपर्कात येतो तेव्हा तो वेगाने थंड होऊ लागतो. तापमान एका विशिष्ट मर्यादेखाली गेले की हवेला दवबिंदू म्हणतात. त्या टप्प्यावर हवा त्यातील अतिरिक्त बाष्प वायुरूपात टिकवून ठेवू शकत नाही. मग त्या वाफेचे रूपांतर पाण्याच्या अतिसूक्ष्म थेंबांमध्ये होते. हे थेंब इतके हलके असतात की ते हवेत तरंगत राहतात आणि प्रकाश सर्व दिशांना विखुरतात. त्यामुळेच आपल्याला पांढऱ्या धुक्यासारखा भास होतो.
## ढग तयार होण्यासारखीच प्रक्रिया
ढग आणि धुके तयार होण्याची प्रक्रिया याच प्रकारची असते. फरक एवढाच की आपल्या तोंडासमोर तयार होणारा हा छोटा ढग काही सेकंदच टिकतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर खरी वाफ किंवा पाण्याची वाफ हा अदृश्य वायू असतो. हिवाळ्यात दिसणारे पांढरेशुभ्र धुके म्हणजे प्रत्यक्षात पाण्याचे अतिसूक्ष्म थेंब असतात. चहाच्या किटलीतून वर येणारी पांढरी वाफही अशीच तयार होते. गरम पाण्यातून बाहेर पडणारी अदृश्य वाफ थंड हवेच्या संपर्कात येताच तिचे रूपांतर पाण्याच्या सूक्ष्म थेंबांमध्ये होते. सामान्य भाषेत आपण याला वाफ म्हणतो आणि तसे म्हणणे चुकीचेही नाही.
प्रतिक्रिया व्यक्त करा