मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राज्यातील महाविकास आघाडीतील मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत. राष्ट्रवादीने या विधेयकाबाबत घेतलेल्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही थेट सवाल केला आहे.
राऊतांचा पवार-सुळेंना सवाल
राऊत म्हणाले की, डिलिमिटेशन विधेयकाला आम्ही बदनाम शैतानी विधेयक म्हणतो. देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांना त्यांनी सवाल केला की, कोणत्या देशहितासाठी त्यांनी शरद पवार यांचा पक्ष फोडला आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली, याचे उत्तर त्यांनी द्यायलाच हवे. अमित शाह शरद पवार यांना देशातील भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणतात, असा उल्लेखही राऊत यांनी केला. त्यांच्या मते, देशातील लोकशाही गुलाम बनवण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे या कालपर्यंत या विधेयकाला पाठिंबा देत नव्हत्या. एक महिन्यापूर्वी रामलीला मैदानावर झालेल्या रॅलीत सुप्रिया सुळे आमच्यासोबत होत्या आणि संविधान बचावासाठी आलेल्या जनसागराला अभिवादन करत होत्या. मग अचानक संविधानाच्या विरोधात भूमिका का घेतली, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे, असे राऊत म्हणाले.
इंडिया आघाडीची लढाई सुरूच राहणार
इंडिया आघाडीने लढाई सोडलेली नाही, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले. त्यांच्या माहितीनुसार मल्लिकार्जुन खरगे मुंबईत येत आहेत. बहुतेक राहुल गांधी आणि सोनिया गांधी हेही सोबत असतील. ते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते चेन्नईला जाऊन स्टॅलिन यांनाही भेटणार आहेत. शेवटच्या मिनिटापर्यंत लोकशाही आणि देश बचावाची लढाई सुरूच राहील, असे राऊत म्हणाले. या लढाईत शिवसेना एक मोठा घटक असल्याचे सांगताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यावरही पाठिंबा देण्यासाठी दबावाचा प्रयत्न झाला. आमचे सहा खासदार फोडले गेले आहेत, तीन खासदार आमच्याकडे आहेत आणि त्यांचाही पाठिंबा त्यांना हवा आहे. मात्र सर्व दबाव आणि आमिषे झुगारून उद्धव ठाकरे देशाच्या लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, ते डचमळले नाहीत, असे राऊत म्हणाले. मोदी-शाह यांचे राष्ट्रहित म्हणजे फक्त गौतम अदानी यांचा फायदा करून देणे हेच आहे, असा आरोपही त्यांनी केला. शरद पवार यांची प्रकृती ठीक नसली तरी त्यांच्या पक्षातील सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि इतर नेते आहेत, असेही राऊत म्हणाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा