एक काळ मैदानावर आपल्या फलंदाजीने प्रेक्षकांना थक्क करणारे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या आरोग्याच्या गंभीर समस्यांशी झुंज देत आहेत. त्यांच्या कुटुंबाला मात्र आता मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांबळी यांना मदतीचा हात दिला असून त्यांच्या उपचाराचा पूर्ण खर्च उचलण्याचे आश्वासन दिले आहे. एवढेच नाही, तर त्यांच्या दोन मुलांच्या शिक्षणासाठीही पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
शिंदे यांच्या निवासस्थानी भेट
विनोद कांबळी यांनी आपल्या कुटुंबीयांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत शिंदे यांनी कांबळी यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात आवश्यक उपचार मिळतील, असे सांगितले. आर्थिक अडचणींमुळे उपचारात कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कांबळी यांना मेंदूत रक्ताची गाठ, स्मरणशक्ती कमी होणे अशा आरोग्य समस्या असल्याचे निदान झाले आहे. या बैठकीला कांबळी यांच्या पत्नी अँड्रिया ह्युइट, त्यांची दोन्ही मुले आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे खेळपट्टी क्युरेटर नदीम मेमन उपस्थित होते.
मुलांच्या शिक्षणासाठीही पाठिंबा
शिंदे यांनी कांबळी यांच्या दोन मुलांच्या शिक्षणाबाबतही महत्त्वाची घोषणा केली. त्यांची मुले जीझस आणि जोहाना यांना शिवसेनेकडून पाठिंबा दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. भेटीनंतर बोलताना कांबळी म्हणाले की, शिंदे यांनी त्यांना सगळं ठीक होईल, असा धीर दिला. मुलांना सोबत घेऊन भेटायला आल्याने आपल्याला प्रोत्साहन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेन वॉर्न यांची आठवण काढत, वॉर्नला जसे मारले होते, तसेच पुन्हा मारेन, असेही म्हटले. मात्र हे बोलताना त्यांचे शब्द स्पष्ट ऐकू येत नव्हते; ते अडखळत बोलत होते. त्यांची ही अवस्था पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा दु:ख झाले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा