डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून देशभरात चर्चा सुरू आहे. इंडिया आघाडीकडून या विधेयकाला विरोध केला जात आहे. सरकारने यासाठी विशेष अधिवेशन बोलावले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शरद पवार यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे.
पवारांचे खासदार विधेयकाला पाठिंबा देणार?
काही महिन्यांपूर्वी डिलिमिटेशन आणि महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक पडले होते. इंडिया आघाडीकडून हे विधेयकही पाडले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीत इंडिया आघाडीने काल बैठक घेतली. मात्र, शरद पवार यांच्या पक्षाने या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे इंडिया आघाडीत मोठी फूट पडल्याची चर्चा आहे.
शरद पवार यांचे खासदार या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाकडून आपली भूमिका स्पष्ट केली, तर सुप्रिया सुळे सावध भूमिका घेताना दिसल्या. संख्याबळाचा आकडा गाठण्यासाठी सरकारला बरेच काही करावे लागत असल्याचे सांगितले जात आहे.
पटोले म्हणाले — निर्णय पवार साहेबांचाच
काँग्रेसकडून पवारांच्या पक्षावर जोरदार टीका केली जात आहे. शरद पवार यांचा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही, असा थेट आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शरद पवार यांच्या निर्णयाबद्दल राहुल गांधी यांनीही भूमिका मांडली. या विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर सुप्रिया सुळे राज्याच्या मुख्यमंत्री होणार, अशीही एक चर्चा मध्यंतरी रंगली होती.
त्यातच नाना पटोले यांनी म्हटले की, आता सर्वकाही पवार साहेबांवरच अवलंबून आहे. पण तो त्यांचा निर्णय आहे, त्यांनी काय करावे काय नाही ते त्यांनीच ठरवावे. राहुल गांधी यांनी सकारात्मक भूमिका मांडली असून देशातील लोकांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले, असेही पटोले म्हणाले. पंतप्रधान खोटे बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असून युपीए सरकारच्या काळात सोनिया गांधी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता, असे पटोले म्हणाले. २०२३ मधील महिला विधेयक एकाच मताने मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. २०२४ मध्येच महिला आमदार जास्त राहिल्या असत्या, पण भाजपाच्या राजकारणामुळे २०२४ मध्ये हे आरक्षण लागू करण्यात आले नाही, असा आरोप त्यांनी केला.
प्रतिक्रिया व्यक्त करा