आयपीएलच्या नव्या हंगामाआधी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा रोहित शर्माची निवड झाली आहे. या निवडीनंतर रोहितने आपल्या मनातील एक भावनिक आणि धक्कादायक खुलासा केला आहे. सुरुवातीला आपल्याला पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार व्हायचेच नव्हते, असे रोहितने कबूल केले आहे. मात्र फ्रँचायझीचे मालक आकाश अंबानी यांच्याशी झालेल्या एका विशेष भेटीनंतर त्याने आपला निर्णय बदलला आणि संघाचे नेतृत्व स्वीकारण्यास होकार दिला.
फोन आला तेव्हा पत्नीशी बोलत होतो
मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या विशेष मुलाखतीचा एक व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर शेअर केला आहे. या मुलाखतीत रोहितने पडद्यामागची कहाणी सांगितली आहे. आकाश अंबानी यांनी फोन केला तेव्हा तो आपल्या पत्नीशी बोलत होता, असे रोहितने सांगितले. त्यानंतर दोघांची भेट झाली आणि संघाला पुढे कसे न्यायचे यावर सविस्तर चर्चा झाली. दोघांनी आपापल्या कल्पना एकमेकांना सांगितल्या.
या चर्चेदरम्यान आकाश अंबानी यांनी रोहितला पुन्हा कर्णधारपदाची ऑफर दिली. मात्र रोहितचे सुरुवातीचे उत्तर नकारात्मक होते. सुरुवातीला आपल्याला या जबाबदारीसाठी तयार वाटत नव्हते, असे रोहित म्हणाला. घरी जाऊन विचार करतो, असे त्याने आकाश यांना सांगितले. अलीकडे बरेच काही घडले होते आणि ही जबाबदारी आपण पार पाडू शकू की नाही याबाबत त्याच्या मनात शंका होती.
मात्र तरीही रोहितला आपल्या मनाकडे आणि मुंबई इंडियन्सशी असलेल्या जुन्या नात्याकडे दुर्लक्ष करता आले नाही. संघाला आपली एक नेता म्हणून गरज आहे, असे तो म्हणत नाही. पण संघाला योग्य दिशा देण्याची गरज आहे, असे त्याला आतून वाटत होते. हा संघ आपण स्वतः घडवला आहे आणि दहा वर्षे त्याचे कर्णधारपद भूषवले आहे. त्यामुळे हे आव्हान पुन्हा एकदा का स्वीकारू नये, असा विचार करून त्याने होकार दिला.
चांगला क्रिकेट न खेळल्याची निराशा
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२० पासून एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. कर्णधार म्हणून रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या या दोघांनाही २०२० पासून संघाला विजेतेपद मिळवून देता आलेले नाही. गेल्या काही हंगामांतील संघाच्या खराब कामगिरीबाबत रोहितने निराशा व्यक्त केली आहे. खेळाडू म्हणून मैदानावर ज्या पद्धतीने खेळ झाला त्यामुळे संपूर्ण संघ निराश झाल्याचे त्याने सांगितले. हे सर्व व्यावसायिक खेळाडूंच्या बाबतीत घडते, असे रोहित म्हणाला. तो केवळ एक-दोन खेळाडूंबद्दल बोलत नसून संपूर्ण संघाबद्दल बोलत असल्याचे त्याने स्पष्ट केले. प्लेऑफसाठी पात्र न ठरल्याची निराशा तितकी नव्हती, जितकी चांगला क्रिकेट न खेळल्याची आणि आपल्या जबाबदाऱ्या पार न पाडल्याची होती, असे रोहितने म्हटले.
प्रतिक्रिया व्यक्त करा