नवी मुंबई, ठाणे, मुंब्रा आणि कल्याण-डोंबिवलीदरम्यानचे अंतर कमी करणाऱ्या ऐरोली-काटई उन्नत मार्गाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या या पाहणीची छायाचित्रे आणि चित्रफीत प्रसारित होताच मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्याचा समज वाहनचालकांमध्ये पसरला. अनेक वाहनचालकांनी या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्र्यांचा ताफा निघून गेल्यानंतरही मार्ग बंदच असल्याने बोगद्याच्या प्रवेशद्वारावरून वाहनांना माघारी वळवण्यात आले. त्यामुळे परिसरात वाहतूककोंडी झाली.
प्रकल्पामुळे प्रवास किती सोपा होणार?
ऐरोली-काटई उन्नत मार्ग हा एमएमआरडीए क्षेत्रातील महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. सुमारे १२.७१ किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे ऐरोली ते डोंबिवली, मुंब्रा आणि ठाणेदरम्यानचे अंतर सुमारे सात ते आठ किलोमीटरने कमी होणार आहे. तसेच प्रवासासाठी लागणारा तीस ते पंचेचाळीस मिनिटांचा वेळ वाचणार आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई ते डोंबिवली हे अंतर अवघ्या पंधरा मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाच्या कामाची नुकतीच एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी पाहणी केली होती. उर्वरित कामे पूर्ण करून सुरक्षेच्या उपाययोजना केल्यानंतर पुलाच्या दोन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
या मार्गामुळे नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. सध्या या भागातील प्रवाशांना लांबचा वळसा घालून प्रवास करावा लागतो. उन्नत मार्ग सुरू झाल्यानंतर दैनंदिन प्रवास जलद आणि सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच या मार्गाकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
गैरसमज कसा पसरला आणि पोलिसांचे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भिवंडी आणि कल्याणजवळील नेवाळी येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या मुलांच्या विवाहसोहळ्यांना हजेरी लावली. भिवंडी ते कल्याण प्रवासानंतर त्यांनी परतीच्या प्रवासासाठी ऐरोलीमार्गे कल्याण ते नवी मुंबई असा प्रवास केला. यावेळी त्यांनी ऐरोली-काटई उन्नत मार्गाची पाहणी केली. या पाहणीची छायाचित्रे आणि चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होताच हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाल्याचा समज वाहनचालकांमध्ये झाला. त्यामुळे नवी मुंबईकडून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या तसेच मुंब्रामार्गे नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी या मार्गाकडे धाव घेतली. मात्र पुलाकडे जाणाऱ्या मार्गावरच त्यांना रोखण्यात आले. त्यानंतर वाहनांना पुन्हा पुलाखालील रस्त्यावर वळवण्यात आल्याने वाहतूककोंडी झाली.
हा मार्ग अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मुंब्रा वाहतूक पोलिसांनी केले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा