सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांवर सूज आल्यासारखे दिसते, तर काही वेळा डोळे रक्तासारखे लाल होतात. डोळ्यांच्या या तक्रारींकडे बहुतेक जण फारसे लक्ष देत नाहीत. मात्र अपुरी झोप, डोळ्यांमधील कोरडेपणा किंवा डोळ्यात गेलेली धूळ-माती यामुळे सकाळी उठल्यावर डोळ्यांचा लालसरपणा वाढू शकतो. सातत्याने दुर्लक्ष केल्यास गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते.
डोळे लाल होण्यामागील कारणे
सकाळी उठल्यावर डोळे लाल होण्याच्या समस्येला वैद्यकीय भाषेत सबकंजंक्टिव्हल हेमरेज असे म्हणतात. यामध्ये डोळ्याच्या पांढऱ्या भागावरील छोटी रक्तवाहिनी फुटते आणि तिथे रक्त साचल्यासारखा लालसर डाग तयार होतो. जोरात खोकला येणे, शिंक येणे, डोळे जोरात चोळणे किंवा जड वजन उचलणे यामुळे डोळ्यांची रक्तवाहिनी फुटण्याची शक्यता वाढते. डोळ्यांमधील कोरडेपणामुळेही डोळे लालसर होऊ शकतात. झोपताना डोळ्यांमधील ओलावा कमी झाला किंवा पंखा किंवा एसीची हवा थेट डोळ्यांवर लागत असेल, तर डोळे कोरडे होऊन जातात. याशिवाय कंजंक्टिव्हायटिस म्हणजे डोळ्यांचा संसर्गही लालसरपणाचे कारण ठरू शकतो. संसर्ग झाल्यावर डोळे लाल होतात किंवा डोळ्यांमधून पाणी येऊ लागते.
लक्षणे कोणती आणि कधी डॉक्टरांकडे जावे
रक्तवाहिनी फुटल्यानंतर डोळ्याच्या पांढऱ्या भागावर गडद लाल किंवा चमकदार ठिपका तयार होतो. कालांतराने त्या डागाचा रंग लालवरून तपकिरी, जांभळा किंवा पिवळसर होतो. डोळ्यांमध्ये जडपणा जाणवणे, सौम्य खाज सुटणे, काहीतरी टोचल्यासारखे वाटणे किंवा डोळ्यांमध्ये वेदना होणे ही लक्षणे दिसू शकतात. काही वेळा पापण्यांवर चिकट पदार्थ किंवा घाण जमा होऊन राहते आणि डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोळे लाल होणे किंवा पापण्यांवर खपल्या जमा होणे अशी लक्षणे दिसतात. अशी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते, त्यामुळे वेळीच काळजी घेणे हिताचे ठरते.
प्रतिक्रिया व्यक्त करा